बारामुल्ला -जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग आणि बारामुल्लामध्ये गुरुवारी दोन ठिकाणी झालेल्या चकमकीत ६ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. अनंतनागच्या अरवानी गावात दहशतवादी लपून बसल्याची सूचना प्राप्त झाल्यानंतर शोधमोहीम हाती घेण्यात आली. या वेळी झालेल्या गोळीबारात चार दहशतवादी मारले गेले. दुसरीकडे बारामुल्ला जिल्ह्यात करिरी पट्टण परिसरात गुरुवारी सुरक्षा दलाची लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्यांशी चकमक झाली.
यात दोन दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले. एका पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, गुप्त माहितीच्या आधारे राष्ट्रीय रायफल्स, पोलिसांचे विशेष पथक आणि सीआरपीएफच्या जवानांनी करिरी पट्टणमध्ये शोधमोहीम राबवली. या भागातील सर्व मार्ग बंद करण्यात आले. घराघरात शोध घेण्यात आला. सुरक्षा दलाचे जवान गावातील एका घराजवळ पोहोचले तेव्हा दहशतवाद्यांनी ऑटोमॅटिक शस्त्रांद्वारे गोळीबार सुरू केला.
उत्तरादाखल केलेल्या कारवाईत सुरक्षा दलांनी घराला स्फोटकांनी उडवून दिले. ढिगारा काढत असताना यात लपलेल्या दहशतवाद्यांनी पुन्हा गोळीबार सुरू केला. पण सुरक्षा दलांनी दोन्ही दहशतवाद्यांचा खात्मा केला. दहशतवाद्यांकडील स्फोटके जप्त करण्यात आली.

Post a Comment