सुत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, केंद्र सरकारने इंधनावरील विशेष उत्पादन शुल्क कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

दिल्ली - पेट्रोल व डिझेलच्या वाढत्या दरांनी त्रस्त असलेल्या सामान्यांना केंद्र सरकारने मोठा दिलासा दिला आहे. पेट्रोल व डिझेलचे दर अडीच रूपयांनी कमी केल्याची महत्त्वपूर्ण घोषणा केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी केली आहे. त्यापाठोपाठ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राज्य सरकार पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट अडीच रूपयांनी घटविणार असल्याची घोषणा केली. उद्या शुक्रवारपासून याची अंमलबजावणी केली जाणार असल्याचे, राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पेट्रोल व डिझेल 5 रूपयांनी स्वस्त झाले आहे.
दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत अरूण जेटली यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितले, 'इंधनाच्या विशेष उत्पादन शुल्कामध्ये केंद्रातर्फे दीड रूपयांची घट केली जाणार आहे. तर तेल कंपन्या एक रूपयाची सूट देणार आहेत. याप्रमाणे केंद्राकडून पेट्रोल-डिझेलचे दर अडीच रूपयांनी कमी केले जाणार आहेत.' केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धमेंद्र प्रधान यांच्याशी आपण याबाबत चर्चा केली असून यासंबंधीच्या प्रस्तावाला पंतप्रधान मोदींनीही मान्यता दिली आहे, असे जेटली यांनी सांगितले.
तसेच राज्यांनीही केंद्राप्रमाणे पेट्रोल-डिझेलच्या करात अडीच रूपयांपर्यंत सूट द्यावी, अशी विनंतीही त्यांनी केली आहे. जेणेकरून देशभरातील पेट्रोल व डिझेलचे दर 5 रुपयांनी स्वस्त होतील.
Post a comment