पारोळा- राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर मोंढाळे गावापुढे दळवेल पेट्रोल पंपाजवळ सोमवारी सकाळी 8 वाजून 50 मिनिटांनी सुरतहून नशिराबादकडे जाणारया कारला समोरून येणाऱ्या भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली. यात कारमधील तिघांचा जागेवरच मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन बालकांचा समावेश आहे तर 4 जण गंभीर जखमी झाले आहेत.
मृतांचे नातेवाईक अरफादखान (रा.सुरत) यांनी माहिती देताना सांगितले की, त्यांची बहिण सय्यद सिरीन जी ( रा. नशिराबाद, जि. जळगाव) ही गरोदर असून तिच्या सातव्या महिन्याच्या खोळ भरण्याच्या कार्यक्रमासाठी आम्ही कुटुंबीय सुरत येथून आलो आहे. पहाटे 2 वाजता (जीजे-05 आर.डी.6968) व (जीजे 21 ए.एन.4590) या दोन गाड्यांनी नशिराबादकडे निघालो होतो. या पहिल्या गाडीला पाळोळ्याजवळ समोरुन येणार्या भरधाव ट्रकने (जीजे-36 डी 9975) जोरदार धडक दिली. अपघात एवढा भीषण आहे की, कारच अक्षरश: चुराडा झाला आहे. अपघातात मुन्नाभाई शेख (46), हुमेरा (७) व शेख हसने या तिन्ही बापलेकांचा जागेवरच मृत्यू झाला. शहनाज खान अफजल (16), फरजाना शेख मुजीब (50), सना सय्यद हसीम शेख (14) व आसीम शेख (30) हे चौघे गंभीर जखमी झाले आहेत. चौघांना बहादरपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेने धुळे येथे हलविण्यात आले आहे.
दरम्यान, हुमेरा हिची काही प्रमाणात हालचाल दिसून आल्याने अरफाद खान याने तिला रक्तबंबाळ अवस्थेत उचलीत आपल्या वाहनातून पारोळा कुटीर रुग्णालयात दाखल केले. परंतु जास्त रक्तस्राव झाल्याने तिचा मृत्यू झाला. नशिराबाद येथील बहिणेचे पती सय्यद तोफिक हे बांधकाम मिस्तरी असून आज होणाऱ्या खोळ भर कार्यक्रमावर दु:खाचे सावट पसरले होते.
रुग्णालयात आक्रोश..
यावेळी टवेरा वाहनातील नातेवाईकांनी अपघातातील मयताना पाहिल्यावर मोठा आक्रोश केला यावेळी पारोळा येथील अनेक समाज बांधवानी मोठी गर्दी केल्याने कुटीर रुग्णालयाला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते . या बाबत घटनास्थळावर पोलीस हे कॉ काशिनाथ पाटील , दीपक आहिरे यांनी भेट देवून पंचनामा केला तसेच ट्रक चालकाला ताब्यात घेतले आहे

Post a Comment