0
  • Both of the blood in the tub water disputeऔरंगाबाद - नळावर पाणी भरण्याच्या वादातून लोखंडी फायटरने मारहाण करून खून करणाऱ्या दोघांना जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांनी जन्मठेप व प्रत्येकी २५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. पैठण तालुक्यातील नांदलगाव येथील रहिवासी अण्णासाहेब बनसोडे नळावर पाणी भरण्यासाठी गेले होते. या वेळी शेतीच्या जुन्या वादातून ३१ ऑगस्ट २०११ रोजी दुपारी सय्यद निसार सय्यद हबीब (३२), प्रकाश हरिश्चंद्र भुजंग (२९), अमोल रघुनाथ चाबुकस्वार (३५) आणि सय्यद हबीब सय्यद अहमद या चौघांसोबत बनसोडेचा वाद झाला.

    त्या चौघांनी शिवीगाळ, लोखंडी फायटर, लाकडी दांड्याने मारहाण करून त्यांना जखमी केले. बनसोडे यांना तातडीने उपचारासाठी औरंगाबाद येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना अण्णासाहेब बनसोडे १ सप्टेंबर २०११ रोजी मरण पावले असल्याने राधाबाई अण्णासाहेब बनसोडे यांच्या फिर्यादीवरून बिडकीन पोलिस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
    पोलिसांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या खून खटल्याची अंतिम सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांच्या समोर झाली असता सहायक लोक अभियोक्ता ज्ञानेश्वरी नागुला यांनी १४ साक्षीदार तपासले. यामध्ये फिर्यादीसह दोघे जण फितूर झाले. न्यायालयाने प्रकाश हरिश्चंद्र भुजंग आणि अमोल चाबुकस्वार या दोघांना भादंवि ३०२ कलमान्वये दोषी ठरवून जन्मठेप, प्रत्येकी २५ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक वर्षे सक्तमजुरी. भादंवि ३२४ कलमान्वये एक वर्षे सक्तमजुरी प्रत्येकी ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. न्यायालयाने सय्यद निसार व सय्यद हबीब या दोघांना सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्त करण्याचे आदेश दिले.

Post a Comment

 
Top