0
लातूर - परदेशात ‘मी टू’ प्रकरणात आरोप झालेल्या ३०० पैकी ११० उच्चपदस्थांना आपली पदे गमावावी लागली आहेत. त्यातील सर्वच पदांवर महिलांची नेमणूक करण्यात आली आहे. पुरुषांची “मी टू’ ची सरसकट सर्वच प्रकरणे खरी नाही मानली तरी बहुतांश प्रकरणांत तथ्य आहे हे मान्य करावे लागेल. एखादी महिला मोकळ्या मनाने समाजात वावरली तर ती सर्वांसाठी उपलब्ध आहे, असे मानणारा मोठा वर्ग समाजात आहे. “मी टू’ मोहिमेमुळे अशा मनोवृत्तीला आळा बसला तरी ते पुरेसे आहे, असे मत आ. नीलम गोऱ्हे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. लातूर येथे महिला कायदेविषयक जनजागृतीसाठी गोऱ्हे यांच्या स्त्री आधार केंद्राच्या वतीने एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्या पुढे म्हणाल्या की, या कार्यशाळेत महिलाविषयक कायदे, त्याच्या अंमलबजावणीतील त्रुटी, सरकारी वकील, तपास अधिकारी, समाजसेवक, माध्यमे यांचे महिला आणि मुलांच्या गुन्ह्यातील भूमिका या विषयी महिला कार्यकर्तींना प्रशिक्षित करण्यात आले. महिलाविषयक गुन्ह्यांमध्ये सर्वाधिक प्रकार विनयभंग, बलात्कार आणि अपहरणाचे आहेत. यातील वैद्यकीय तपासणी नियमावलीची अंमलबजावणी व्हावी यासाठी आम्ही सरकारकडे आग्रह धरणार आहोत.

Post a Comment

 
Top