0
 • Nanded district's 78 farmers suicides in 10 monthsनांदेड - जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र काही थांबण्याचे नाव घेत नाही. यावर्षी आतापर्यंत कर्जबाजारीपणा आणि नापिकीला कंटाळून 78 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. यंदा अत्यल्प पर्जन्यमान झाले. जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती आहे. त्यामुळे शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.


  जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सन 2000पासून सुरू झाले. परंतु त्या वेळी अशा घटनांची संख्या नगण्य असल्याने त्याकडे फारसे कोणी लक्ष दिले नाही. पण हळूहळू हे प्रमाण वाढत गेले आणि आता या समस्येने गंभीर वळण घेतले. गेल्या वर्षीही पावसात खंड आणि अत्यल्प पाऊस झाला तरी परतीचा पाऊस जोमाने बरसला. त्यामुळे खरीप, रब्बी हंगाम दोन्ही मिळून शेतकऱ्यांना थोडा दिलासा मिळाला. परंतु यंदा मात्र परतीच्या पावसाने जिल्ह्याकडे पूर्णत: पाठ फिरवली. त्यामुळे खरीप हंगाम गेला आणि रब्बी हंगामाची शाश्वती राहिली नाही. त्यामुळे शेतकरी वर्ग पुरता निराशेच्या खाईत लोटला गेला. त्यातून आता आत्महत्यांचे दुष्टचक्र वेगाने फिरू लागले. राज्य सरकारही दुष्काळ जाहीर करण्यास वेळ लावत आहे. तातडीने दुष्काळ जाहीर करून दुष्काळी योजनांची अंमलबजावणी केल्यास या दुष्टचक्राची गती मंदावेल, असे जाणकारांना वाटते.
  78 जणांनी मृत्यूला कवटाळले 
  यावर्षी आतापर्यंत जिल्ह्यात 78 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. फेब्रुवारी (11) आणि जून (10) या दोन महिन्यांत शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण सर्वाधिक राहिले. तर चालू महिन्यात गेल्या 25 दिवसांत 12 शेतकऱ्यांनी आपली इहलोकीची यात्रा संपवली. एकूण 78 शेतकऱ्यांपैकी 41 शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना शासनातर्फे सानुग्रह मदत देण्यात आली, तर 29 शेतकरी शासन मदतीसाठी अपात्र ठरले. 8 प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत. यावर्षी असा एकही महिना नाही ज्या महिन्यात कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या झाली नाही. 
  महिनानिहाय झालेल्या आत्महत्या 
  जानेवारी- 6, फेब्रुवारी- 11, मार्च- 8, एप्रिल- 4, मे-7, जून- 10, जुलै- 6, ऑगस्ट- 8, सप्टेबर- 6, ऑक्टोबर- 12

  Post a Comment

   
  Top