- अमृतसर - पंजाबच्या अमृतसर जिल्ह्यात पोलिसांचा अमानवीय चेहरा समोर आला आहे. येथील चाविंडा परिसरात एका महिलेला पोलिसांनी चक्क आपल्या गाडीच्या छतावर बसवून तिची धिंड काढली. गावातील परिसरात तशाच अवस्थेत बांधून तिला फिरवत होते. याच दरम्यान काही गावकऱ्यांना हा प्रकार दिसून आला. त्यांनी दुसऱ्या ग्रामस्थांना बोलावले. वाढती गर्दी पाहता पोलिसांनी त्या महिलेला वेळीच गाडीवरून काढले आणि तिला रस्त्यावर फेकून पसार झाले. या घटनेचा व्हिडिओ सुद्धा समोर आला आहे.
काय आहे प्रकरण?
चाविंडा परिसरात पोलिस अधिकारी एका आरोपीला अटक करण्यासाठी पोहोचले होते. परंतु, घरात गेल्यानंतर त्यांना आरोपी सापडला नाही. पोलिसांना संशयित आरोपीची पत्नी घरात दिसली. त्यांनी तिलाच अटक करण्याचा प्रयत्न केला. महिलेने विरोध केला तेव्हा तिच्यावर बळजबरी करून तिचे हात-पाय बांधले. यानंतर तिला गाडीच्या छतावर ठेवून गाव परिसरात तिची धिंड काढली. ही धक्कादायक घटना पाहून लोकांनी एकमेकांना बोलावले आणि ग्रामस्थांची गर्दी वाढत गेली. गावकऱ्यांना घाबरून पोलिसांनी त्या महिलेला रस्त्यावर फेकले आणि पळ काढला.
वरिष्ठांकडे तक्रार केली तेव्हा...
या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यावर प्रतिक्रिया देताना अमृतसरचे पोलिस उपाधीक्षक म्हणाले, की हा व्हिडिओ गेल्या वर्षीचा आहे. क्राइम ब्रांचची एक टीम अटकेसाठी चाविंडा गावात गेली होती. त्यावेळी ही घटना घडली असेही त्यांनी मान्य केले. संतप्त ग्रामस्थांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे या घटनेची तक्रार केली. सोबतच त्याचा व्हिडिओ देखील दाखवला. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून लवकरच सत्य समोर येईल असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आश्वस्त केले आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a comment