0


 • मुंबई- देशात जातीय तणाव निर्माण करण्यासाठी काश्मिरी, आसामी फुटीरतावाद्यांची मदत घेऊन नरेंद्र मोदी यांची केंद्रातील सत्ता उलथवून टाकण्याचा माओवाद्यांचा कट होता. यासाठी वेळप्रसंगी चिनी व रशियन बनावटीच्या ग्रेनेड लाँचर्ससह शस्त्रांच्या खरेदीचीही तयारी होती. तसेच, जेएनयूच्या विद्यार्थ्यांना यात सहभागी करून घेतले जाणार होते. पुणे पोलिसांनी टाकलेल्या छाप्यांत जप्त केलेल्या पत्रांतून या कटाचा उलगडा झाला आहे. याशिवाय माओवादी नेत्यांना तुरुंगातून सोडवण्यासाठी काँग्रेसमधील काही नेत्यांनी शब्द दिला असल्याचेही काही पत्रांत नमूद आहे.


  भीमा-कोरेगाव येथील आंदोलनानंतरच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी २३ ऑगस्टला देशात ९ ठिकाणी छापे टाकून माओवाद्यांचा कथित थिंक टँक म्हणून ओळखले जाणारे वरवरा राव (हैद्राबाद), छत्तीसगढचे सुधा भारद्वाज व गौतम नवलाखा, व्हेरनाॅन गोन्साल्विस (मुंबई) आणि अरुण परेरा (ठाणे) यांच्यासह काही जणांना अटक केली होती. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार थिंक टँक म्हणून ओळखले जाणार पाच जण सध्या पुणे पोलिसांच्या नजरकैदेत आहेत. पोलिसांनी संशयितांच्या घरातून संगणक, लॅपटाॅप, हार्ड डीस्क, पेन ड्राईव्ह असे साहित्य जप्त केले होते. त्यातील सर्व माहितीची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. राज्याचे अतिरिक्त पोलिस महासंचालक परमवीर सिंग यांनी उपरोक्त नमूद पाच विचारवंतांच्या नक्षलवाद्यांशी झालेल्या पत्रव्यवहारातील माहिती शुक्रवारी पत्रकारांना वाचून दाखवली.

  इतर पत्रांतूनही कटाचे संदर्भ
  कवी वरवर राव यांनी नागपूरच्या अॅड. सुरेंद्र गडलिंग यांना १७ मार्च २०१७ रोजी लिहिलेले पत्र यात आहे. त्यामध्ये ते नोटबंदीच्या काळात तुम्ही पुरेसा पैसा पुरवला नाही तसेच सरकारविरोधात पुरेशी नाराजी पसरवू शकला नाहीत. त्यामुळे तुमच्याविषयी मोठी नाराजी आहे, असे म्हणतात. राव यांच्या पत्राला गडलिंग यांनी दिलेल्या उत्तरात नोटबंदीच्या काळात उभारलेल्या चेकपोस्टमुळे छत्तीसगडच्या जंगलातील काॅम्रेडना पैसा पाठवू शकलो नाही, असा उल्लेख आहे.

  सेंट्रल कमिटीचा सदस्य मिलिंद तेलतुंबडे याने महाराष्ट्र स्टेट झोनल कमिटीला लिहिलेले पत्र सापडले आहे. त्यामध्ये माओवाद्यांना अधिक प्रसिद्धी मिळेल असे काम करण्यासंदर्भात तेलतुंबडे याने बजावले आहे. ती कामगिरी सुरेंद्र गडलिंग करतील तसेच त्या योजना जंगलातील काॅम्रेडपर्यंत गडलिंग पोचवतील. त्यासाठी वरवर राव पैसा पुरवतील असे उल्लेख त्या पत्रात आहेत.

  कारवाईचे व्हिडिओ चित्रीकरण
  ९ ठिकाणी टाकलेल्या छाप्यात हजारपेक्षा अधिक पत्रे सापडली आहेत. ती पंचासमक्ष जप्त करण्यात आली असून त्याचे व्हिडिओ चित्रीकरण करण्यात आले आहे. सर्व पत्रे इंग्रजीत आहेत. ती पेनड्राइव्हमध्ये केली जात आणि ते पेनड्राइव्ह किंवा हार्ड डिस्क कुरियरमार्फत पाठवली जात असत. ज्या डिव्हाइसमध्ये पत्रे असत त्याला एक कोड असे. तो केवळ ज्याला डिव्हाइस पाठवायचे आहे, त्याला माहिती असे. त्यामुळे इतरांना त्यातील माहिती कळणे शक्य नव्हते. जप्त डिव्हाइस न्यायवैद्यक शाळेत सुरक्षित असून त्याचे क्लोन करून प्रयोगशाळेने पुणे पाेलिसांना दिले आहेत.

  लॅपटॉपमध्ये होता शस्त्रांचा कॅटलॉग
  रोना विल्सन यांच्या लॅपटाॅपमध्ये रशियन आणि चिनी बनावटीच्या शस्त्रांचा एक कॅटलाॅग सापडला असून तो रोनाने आंध्रचे वरवर राव यांच्यामार्फंत काॅ. प्रकाशला पाठवला असल्याचे म्हटले आहे. या सर्व शस्त्रांची खरेदी राव यांच्यामार्फत केली जाणार होती. त्यासाठी नेपाळ आणि म्यानमारमधील फुटीरवादी माओवाद्यांना मदत करणार होते. माओवाद्यांचा मोठ्या घातपाताचा कट स्पष्ट होतो.
  पोलिस महासंचालकांनी दाखवले पत्रांचे पुरावे
  १ : छत्तीसगढच्या सुधा भारव्दाज सध्या नजरकैदेत आहेत. माओवादी काॅ. प्रकाशला लिहिलेल्या पत्रात त्या म्हणतात, ‘प्रशांतच्या अटकेनंतर मला पैसे मिळणे बंद झाले आहे. पीपीएससाठी काॅ. सुरेंद्रने (गडलिंग) नागपूरच्या मिटिंगमध्ये पैसे देण्यास नकार दिला आहे.’

  २ : माओवाद्यांच्या केंद्रीय समितीचे काॅ. सुदर्शन याने नजरकैदेत असलेल्या गौतम नवलखा याला लिहिलेल्या पत्रात जातीय दंगलींवर बनवलेल्या फॅक्ट फाईंडिंग कमिटी अहवालाचा इतर राज्यात जातीय तणाव वाढवण्यासाठी वापर करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत.

  ३ : रोना विल्सनने काॅ. प्रकाशला जुलै २०१७ मध्ये पत्र लिहिले. यात अरुण (परेरा) व वर्मन (गोन्सालवीस) यांचा उल्लेख आहे. तसेच शस्त्र खरेदीसाठी वर्षाला ८ कोटींची गरज असल्याचे नमूद करून यात ४ लाख राऊंड (गोळ्या) व रशियन-चिनी ग्रेनेड लाँचर्स खरेदीचा उल्लेख आहे.

  माओवाद्यांच्या सुटकेला काँग्रेसची मदत?
  माओवादी नेते काॅ. कोबाड गांधी, नागपूरचे अॅड. सुरेंद्र गडलिंग आणि जेएनयूचे प्रा. साईबाबा यांना तुरुंगातून सोडवण्यासाठी काँग्रेसमधील काही नेत्यांनी शब्द दिला होता, अशी धक्कादायक माहिती पुणे पोलिसांनी २३ आॅगस्टला टाकलेल्या छाप्यात हाती आलेल्या पत्रात मिळाली आहे. ‘भीमा कोरेगावच्या आंदोलनाला मोठा पाठिंबा मिळतो आहे. हे आंदोलन प्रभावशाली होते. या आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाच्या घटनेचा खुबीने वापर केला पाहिजे. भाजप, आरएसएस आणि ब्राह्मण यांच्या विरोधात दलितांची भावना वाढीस लागली अाहे’, असे पत्रात म्हटले आहे. गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी आणि जेएनयूचा विद्यार्थी नेता उमर खालीद हे आपल्या क्रांतीचे नेते आहेत. अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या मदतीने देशातील दलितांची मोदींविरोधात आपण मोट बांधू शकतो. काॅ. सुधीरला दोन टप्प्यांत भीमा कोरेगाव आंदोलनासाठी निधी दिला आहे, अशी माहिती या पत्रात आहे. भाजपशासित राज्यात सरकारविरोधात निदर्शने करण्यासाठी यूएसडीएफचे कार्यकर्ते आपल्याला मदत करणार आहेत. नरेंद्र मोदी यांचा अश्वमेध २०१९ मध्ये राेखणे शक्य आहे, असे पत्रात म्हटले आहे. काॅ. कोबाड गांधी, अॅड. सुरेंद्र गडलिंग आणि प्रा. साईबाबा यांना तुरुंगातून सोडवण्यासाठी आपल्या शहरी काॅम्रेड‌्सना काँग्रेस पक्षामधील आपल्या मित्रांनी शब्द दिला आहे. अशी खळबळजनक टिप्पणी या पत्रात आढळून आली आहे. त्यामुळे मोठी खळबळ माजली आहे.

  काँग्रेसने आरोप फेटाळले 
  सर्व आरोप काँग्रेसने फेटाळले आहेत. माओवाद्यांना मदत करण्याची काँग्रेसची कधीच भूमिका नव्हती. ही कथीत पत्रे पुणे पोलिसांनी माध्यमांऐवजी न्यायालयात द्यावीत. असे सांगून माओवाद्यांना मदत करणारे काँग्रेसमधील नेते पोलिसांनी खुशाल शोधून काढावेत, असे आव्हान काँग्रेस नेते डाॅ. राजू वाघमारे यांनी दिले आहे.
  Bhima koregao violence press conference of PB Singh, ADG, Maharashtra Police

Post a Comment

 
Top