मुंबई - पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट रद्द करून त्याऐवजी जीएसटी लागू करण्याची शिफारस जरी महाराष्ट्र सरकारने केंद्राला केली असली तरीही पेट्रोलच्या दरवाढीमुळे राज्याच्या तिजोरीत घसघशीत भर पडली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात पेट्रोलियम पदार्थावरील कराद्वारे राज्याला मिळणाऱ्या अंदाजित उत्पन्नापैकी जवळपास ६० टक्के महसूल पहिल्या पाच महिन्यांतच सरकारी तिजोरीत जमा झाला आहे. या कमाईमुळे चालू आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात अंदाजित केलेली १५ हजार ३७४ कोटी रुपयांची महसुली तूट किमान अडीच ते तीन हजार कोटी रुपयांनी घटण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. सतत वाढणाऱ्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमुळे सर्वसामान्य जनता हैराण झालेली असताना इंधनाचे वाढते दर राज्य सरकारच्या मात्र चांगलेच पथ्यावर पडले आहेत. पाच महिन्यांपूर्वी राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात अंदाजे १९ हजार कोटींचा महसूल पेट्रोल आणि डिझेलच्या करातून प्राप्त होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र विक्रीकर विभागातील एका बड्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ३१ ऑगस्ट २०१८ पर्यंत पेट्रोल आणि डिझेलवरील कराच्या उत्पन्नापोटी तब्बल १० हजार ९४४ कोटी रुपये सरकारी तिजोरीत जमा झाले आहेत. हे प्रमाण अर्थसंकल्पात अंदाजित केलेल्या इंधनावरील महसुलाच्या जवळपास साठ टक्के इतके आहे. तसेच पुढील दोन ते तीन महिने आंतरराष्ट्रीय स्तरावरील इंधनाचे दर चढे राहिल्यास २०१८-१९ या आर्थिक वर्षअखेरीस फक्त इंधनाद्वारे मिळणाऱ्या कराच्या उत्पन्नाचा आकडा २२ हजार कोटींवर जाऊ शकतो. म्हणजेच अंदाजित उत्पन्नापेक्षा तो तीन हजार कोटींनी वाढू शकतो, असेही हा अधिकारी म्हणाला. विशेष म्हणजे गेल्या आर्थिक वर्षातही पेट्रोलियम पदार्थावरील कराद्वारे मिळालेले उत्पन्न हे २२ हजार ६५२ कोटी रुपये इतके होते. इंधन ‘जीएसटी’त अाल्यास मात्र सरकारी उत्पन्न घटणार
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment