- नाशिक- नाशिक-त्र्यंबकेश्वर महामार्गावरील बेळगाव ढगा शिवारातील चंद्रभागा लॉन्स पाठीमागील सुमारे २० फूट खोल पाझर तलावात गणेश चतुर्थीच्या दिवशी एकाच कुटुंबातील चार महिलांचा बुडून मृत्यू झाला. शेवाळामुळे पाय घसरून तलावात पडलेल्या आईला वाचविताना दोन मुलींसह सुनही बुडाली. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. गुरुवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंंद करण्यात आली आहे.
बेळगाव ढगा शिवारातील सुरेश शिंदे कुटुंबीयांच्या घरात गणेशाेत्सवाचा उत्साह होता. शेजारीच राहणारा त्यांचा भाऊ अरुण यांची पत्नी मनीषा अरुण शिंदे (४५), मुलगी ऋतुजा अरुण शिंदे (१६), वृषाली अरुण शिंदे (२१) व सून आरती नीलेश शिंदे (२४) हे सर्व सुरेश शिंदे यांच्या घरी श्रींच्या आगमनाच्या तयारीसाठी गेले होते. त्यानंतर घरातील कपडे व भांडी धुण्यासाठी नात श्रावणी हिला सोबत घेऊन चंद्रभागा लॉन्सच्या पाठीमागे असलेल्या पाझर तलावावर त्या गेल्या होत्या. पाझर तलावाच्या सिमेट बांधावर शेवाळ आले असल्याने मनीषा यांचा पाय घसरून त्या २० फूट खोल पाण्यात पडल्या. त्यांना वाचविण्याच्या नादात ऋतुजा, वृषाली या दोन्ही मुलींसह सून आरती याही एकमेकींना वाचविण्याच्या प्रयत्नात पाण्यात बुडाल्या. हे दृश्य बघून भेदरलेली श्रावणी धावतच घराकडे गेली व कुटुंबीयांना माहिती दिली.
शेजारील लाेकांनी काढले चारही मृतदेह
या घटनेची कळताच कुटुंबीयांनीही तलावाकडे तातडीने धाव घेतली. मात्र, तोपर्यंत शेजारील लोकांनी या चौघींंना पाण्याच्या बाहेर काढले होते. त्यांना तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. सातपूरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र कुटे यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला. -
-
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment