0
माढा- बिबट्याच्या सततच्या त्रासाला कंटाळून एका ५० वर्षीय दिव्यांग व्यक्तीने झाडावरच लाकडापासून एक झोपडीवजा घर बांधले. प्रकाश दत्ता वाघमोडे असे या अवलिया दिव्यांग शेतकऱ्याचे नाव असून ते सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील बेबळे गावातील रहिवासी आहे. घराशेजारील लिंबाच्या झाडावर बांधण्यात आलेले हे घर पाहण्यासाठी सोलापूर जिल्हा आणि आजुबाजुंच्या परिसरातून बघ्यांची मोठी गर्दी होत आहे. उजनी धरणाच्या कुशीत व तिरावर असलेल्या भागात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्याचा वावर असल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या आठवड्यातच करमाळ्याच्या भागातून उंदरगाव येथून एक बिबट्या वनविभागाने जेरबंद केला आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांमध्ये बिबट्याची मोठी दहशत निर्माण झाली आहे.बेबळे- टेभुर्णी मार्गावर उसाच्या घनदाट शेतातील कालव्याजवळ प्रकाश वाघमोडे हे अनेक वर्षांपासून पत्नी सुमनसमवेत पत्र्याच्या खोलीत राहतात. प्रकाश हे जन्मापासूनच पोलिओग्रस्त आहेत. बिबट्यांच्या दहशतीमुळे हे दांपत्य खूपच भयभीत होते. मात्र, प्रकाश वाघमोडे यांनी यावर युक्ती शोधली. सध्या दोघेही झाडावर बांधलेल्या घरातच राहतात. त्या घरातच त्यांनी आपल्या संसाराला आवश्यक असलेल्या वस्तू ठेवल्या आहेत. तसेच दैनदिन गरजेच्या वस्त्ू ते दिवसा आणून ठेवतात. दरम्यान, या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी त्यांच्यासह परिसरातील नागरिकांनी केली आहे.अशी आहे घराची रचना हे घर लाकूड तसेच केळीच्या सालीपासून साकारले आहे. लिंबाच्या झाडाखाली तळमजला उभारला आहे. यात दिवसा मोकळ्या हवेत आराम करण्याची सोय केली आहे. शेजारीच एक छोटेशे जलतरण तलावही बनवले आहे. या झाडाच्या वरच्या मजल्यावर जाण्यासाठी लाकडाचाच भक्कम जिना उभारलाय. घरात जेवणासाठी मोठी जागा असून झोपण्याही सोय आहे. शिवाय, बाहेरच्या निसर्गाचा आनंद घेण्यासाठी एक गच्चीही उभारली आहे.बिबट्याच्या भीतीमुळे लढवली शक्कल आम्ही उसाच्या घनदाट शेतात राहतो. बिबट्याची आमच्या भागात खूप दहशत आहे. गेल्या ६ महिन्यांपासून हे घर बांधायला सुरुवात केली. हे घर पूर्णपणे लाकडापासूनच तयार केले आहे. मागील ५ दिवसांपासून आमचे येथेच वास्तव्य आहे. आता आम्हाला बिबट्याची भीती नाही. 
  • - प्रकाश व सुमन वाघमोडे farmer built house on tree 

Post a comment

 
Top