0
  • नागपूर- इंधनाची आयात कमी करण्यासाठी केंद्र सरकार युद्धस्तरावर कामाला लागले आहे. इथेनॉलच्या उत्पादनाला अधिक चालना देऊन जैव इंधनाचा प्रसार वाढवण्यासह इलेक्ट्रिकवर चालणारी वाहने परवानामुक्त करण्यात आल्याने येत्या काळात देशात त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येतील, असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी नागपुरात बोलताना व्यक्त केला.


    गडकरी म्हणाले, इंधनाच्या बाबतीत देश स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने यापूर्वीच प्रयत्न होण्याची गरज होती. ते झाले नाही. आता इंधनाचा भार सात ते आठ लाख कोटींवर गेला आहे. त्यामुळे संकट वाढले आहे. त्यामुळे आता युद्धस्तरावर प्रयत्न सुरू आहेत. केंद्र सरकारने त्या दिशेने अनेक निर्णय घेतले आहेत. साखरेचे उत्पादन खूप जास्त झाले आहे. साखर कारखान्यांना दर मिळेनासे झाले. त्यामुळे आता साखरेच्या उत्पादनात दोन टक्के कपात करून उसापासून इथेनॉल निर्मितीला चालना दिली जात आहे. आता सहा टक्के मळी तयार करण्याचे धोरण असून कारखान्यांकडून इथेनॉल खरेदीच्या किमती २५ टक्क्यांनी वाढवण्यात आल्या आहेत. मागणी आणि पुरवठा लक्षात घेऊन देशातील पीक पॅटर्न आता गरजेनुसार बदलला पाहिजे. त्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. इंधनाच्या निर्मितीतून देशात किमान ५० लाख प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होण्याची क्षमता असल्याचे गडकरी म्हणाले. इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या वाहनांचा प्रसार वाढवण्याचे प्रयत्न सुरू असून सहा महिन्यातच ई-बाइक्स, ई-स्कूटर्स, टॅक्सीज चे प्रमाण वाढायला सुरुवात होईल, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला.

    फ्लेक्स इंजिन भारतात 
    शंभर टक्के इथेनॉल किंवा पेट्रोल असे दोन्ही पर्याय उपलब्ध करणारे ब्राझीलचे फ्लेक्स इंजिन तंत्रज्ञान भारतात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. धान्य, अखाद्य तेलबियांपासून निर्मित जैवइंधन, जैव डिझेल, विमान इंधनाला चालना देण्यात येत आहे. अलीकडेच जैव इंधनाच्या माध्यमातून विमानोड्डाणाचा प्रयोग यशस्वी ठरला. आता एव्हिएशन इंधन म्हणून जैव इंधनाच्या वापरासाठी विशेष धोरण अाणु असे गडकरी म्हणाले.
    Dependence of importing fuel will reduce; Union Minister Nitin Gadkari

Post a comment

 
Top