0
नागपूर - भाजपची सत्ता असलेल्या नागपूर महानगरपालिकेत महापौरांच्या अमेरिका दौऱ्याच्या निमित्ताने राजकीय वादळ निर्माण झाले आहे. अमेरिकेच्या अधिकृत दौऱ्यात महापौर नंदा जिचकार यांनी चक्क त्यांच्या मुलास खासगी सचिव बनवून सोबत नेल्याचे कागदोपत्री उघड झाल्याने त्यांच्यावर टीकेची झोड उठत आहे. त्यामुळे सत्तारूढ भाजपची चांगलीच नाचक्की झाली आहे. भाजपने त्यावर महापौरांना स्पष्टीकरण मागवण्याचा निर्णय घेतला आहे.
 • अमेरिकेतील सॅनफ्रान्सिस्को येथे १२ ते १४ सप्टेंबरदरम्यान आयोजित “क्लायमेट अॅंड एनर्जी’ विषयावरील जागतिक परिषद तसेच बोर्ड मीटिंगमध्ये सहभागी होण्यासाठी महापौर गेल्या आहेत. शनिवारी ही परिषद अधिकृतरीत्या संपली असली तरी त्या २० सप्टेंबरला नागपुरात परतणार आहेत.

  या दौऱ्यात त्यांनी त्यांचा लहान मुलगा प्रियेश याला स्वत:चा खासगी सचिव म्हणून सोबत नेल्याचे कागदोपत्री उघड झाल्याने नागपूर महानगरपालिकेतील राजकारण चांगलेच तापले आहे. अमेरिकेच्या राज दूतावासाला व्हिसासाठी देण्यात आलेल्या पत्रातच प्रियेश हा महापौर नंदा जिचकार यांचा स्वीय सचिव असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या संपूर्ण दौऱ्याचा खर्च आयोजक संस्थेच्या वतीने करण्यात येणार आहे. महापौरांचा हा अधिकृत दौरा होता. त्यामुळे मुलाला स्वीय सचिव म्हणून कसे दाखवण्यात आले? असा प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाला आहे.

  महापालिकेस ठेवले अंधारात 
  महापौरांनी दौऱ्यावर जाणार असल्याची कल्पना महानगरपालिकेच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिली असली तरी त्यात मुलाचा स्वीय सचिव म्हणून समावेश असल्याची माहिती कुठेही दिलेली नसल्याचे उघड झाले आहे. महापौरांना स्वीय सहायक म्हणून केवळ महापालिकेचा कर्मचारी ठेवण्याची मुभा आहे. खासगी किंवा स्वीय सचिव ठेवता येत नाही, असा महापालिकेचा नियम असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे यापूर्वीच्या दौऱ्यात महापालिकेचा कर्मचारीच त्यांच्यासोबत गेला आहे.

  यंदा वर्षभरातील हा सहावा विदेश दौरा 
  मागील वर्षभरात नागपूरच्या महापौरांचा हा सहावा विदेश दौरा ठरला आहे. यापूर्वी त्यांनी श्रीलंका, जर्मनी, व्हिएतनाम, चीन, कॅनडाचा दौरा केला आहे. दरम्यान, या प्रकरणात नाचक्की झालेल्या भाजपने त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागवण्याचा निर्णय घेतल्याचे कळते. स्वत:च्या मुलास खासगी सचिव म्हणून दाखवणे हा चुकीचाच प्रकार असल्याचे भाजपचे पदाधिकारी मान्य करीत आहेत. दरम्यान, विरोधी पक्ष काँग्रेस यावर काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष असून काँग्रेसने अद्याप भूमिका जाहीर केलेली नाही
  .  Nagpur BJP Mayor Nanda Jichkar took her son as private secretary on US tour

Post a comment

 
Top