0
नवी दिल्ली- शेअर बाजार शुक्रवारी अक्षरश: हादरला. सकाळी बाजार सुरू झाल्यावर अर्ध्या तासात सेन्सेक्सने ३६८ अंकांची घेतलेली उसळी दुपारनंतर टिकू शकली नाही. पाहता पाहता शेअर्स गडगडू लागले आणि अवघ्या १० मिनिटांत सेन्सेक्स १,१२७ अंकांनी ढासळला.दिवसभराच्या व्यवहारातील ही घसरण १,४९५ अंकांची नोंदली गेली. दिवसअखेर बाजार सावरला आणि सेन्सेक्स केवळ २७९.६२ अंकांनी घसरून ३६,८४१.६० अंकांवर बंद झाला. दुपारनंतर सेन्सेक्समध्ये ८४८ अंकांची सुधारणा झाली. निफ्टी ९१.२५ अंकांनी घसरून ११,१४३.१० अंकांवर बंद झाला.

मार्केट कॅप २ लाख कोटींनी घटले : शुक्रवारी बीएसईचे मार्केट कॅप २.०२ लाख कोटींनी घटले. सप्टेंबरपासून आतापर्यंत ७.८५ लाख कोटींची घसरण नोंदली गेली आहे.
घसरणीची कारणे : यस बँक, डीएचएफएलच्या शेअर घसरणीचा दणका
> आयएलअँडएफएसने कर्जफेड केली नाही. यामुळे ब्रोकिंग संस्थांनी तिचे मानांकन घटवले. आयडीबीआय फेडरल लाइफ इन्शुरन्सचे मुख्य गुंतवणूक अधिकारी अनीश श्रीवास्तवनुसार यामुळे दुसरी एनबीएफसी डाऊनग्रेड होण्याचा धोका झाला.
> डीएसपी म्युच्युअल फंडने या आठवड्यात दिवाण हाउसिंगचे ३०० कोटींचे रोखे विकले होते. फंडचे अध्यक्ष कल्पेन पारेख म्हणाले, रोकडतेचे प्रमाण वाढवण्यासाठी निर्णय घेतला.
> चर्चा आहे की, रिझर्व्ह बँक वित्तपुरवठा कंपन्यांसाठी कर्जपुरवठ्याचे नियम कठोर करू शकते. यामुळे या कंपन्यांची बुडीत किंवा थकीत कर्जे समोर येऊ शकतात.

६० टक्क्यांपर्यंत घसरण
यस बँक व काही वित्तीय कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण सुरू झाली. या कंपन्यांचे शेअर्स ६० टक्क्यांपर्यंत घसरले आणि बाजार हादरला. एमके ग्लोबल फायनान्शियल सर्व्हिसेसचे व्यवस्थापन प्रमुख जोसेफ थॉमस म्हणाले, ‘यस बँक आणि डीएचएफएलच्या शेअर घसरणीमुळे बाजाराचा मूड दुपारी एकदम बदलला. सॅमको सिक्युरिटीजचे सीईओ जिमित मोदी यांच्यानुसार बहुतांश हाउसिंग फायनान्स कंपन्या आर्थिकदृष्ट्या भक्कम आहेत. मात्र, केवळ भीतीमुळे ही घसरण झाली.’ दरम्यान, बाजार सावरला असला तरी वित्तीय कंपन्यांचे शेअर घसरून स्थिरावले.

१५ मिनिटांत सेन्सेक्स १,१२७ अंकांनी घसरला, ८९२ अंकांनी सावरला
> सेन्सेक्स १५७.६७ अंकांनी चढ्या स्थितीत उघडला. नंतर अर्ध्या तासाच्या व्यवहारातच तो तब्बल ३६८ अंकांनी उसळला.
> १२.४३ वाजता सेन्सेक्स निगेटिव्ह झोनमध्ये आला आणि दुपारी सुमारे १ वाजता बाजारात जोरदार घसरण सुरू झाली.
> १.१० वाजेपर्यंत खळबळ माजून १,१२७ अंकांनी म्हणजे ३ टक्के घसरून सेन्सेक्स थेट ३५,९९३.६४ अंकांवर पोहचला.
> १.१५ वाजेपर्यंत सेन्सेक्समध्ये पुन्हा ८९२ अंकांची सुधारणा होऊन तो ३६,८८५.८९ अंकांवर पोहोचला आणि बाजार सावरला.
Share Market Sensex Crashes Over 1100 Points, Nifty Below 11000

Post a Comment

 
Top