- उस्मानाबाद- मागील पाच वर्षांपासून दैनिक “दिव्य मराठी’च्या वतीने राबवण्यात येणाऱ्या इको फ्रेंडली गणेशमूर्ती अभियानाला आता जिल्ह्यात चळवळीचे स्वरूप प्राप्त होत आहे. याचेच उदाहरण म्हणजे गुरुवारी (दि.६) श्रीपतराव भोसले हायस्कूलच्या मैदानावर पार पडलेली जिल्ह्यातील सर्वात मोठी इको फ्रेंडली गणेशमूर्ती कार्यशाळा होय. विविध आठ संस्था संघटनांच्या सहकार्यातून पार पडलेल्या या कार्यशाळेत दोन सत्रांमध्ये तब्बल ४ हजार ९५० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत मातीचे गणपती बनवण्याचे प्रशिक्षण घेतले.
गुरुवारी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास श्रीपतराव भोसले हायस्कूलच्या मैदानावर सकाळच्या सत्रामध्ये आयोजित दिव्य मराठी इको फ्रेंडली गणेशमूर्ती अभियानांतर्गत कार्यशाळेचे उद्घाटन अपर जिल्हाधिकारी पराग सोमण यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, जिल्हा उपनिबंधक (सहकार विभाग) विश्वास देशमुख यांची उपस्थिती होती.
व्यासपीठावर जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष संजय मंत्री, आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे प्रशासकीय अधिकारी आदित्य पाटील, मुख्याध्यापक एस. एस. पडवळ, उप मुख्याध्यापक तथा नगरसेवक सिद्धेश्वर कोळी, शिवशाही युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अभिजित देशमुख, युवा आधार प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर, एकता फाउंडेशनचे अध्यक्ष अमित कदम, अभिलाष लोमटे, भागीरथी परिवाराचे अध्यक्ष अभिराम पाटील, संस्कृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष राम मुंडे, दिव्य मराठीचे ब्युरो चीफ चंद्रसेन देशमुख, खंडू राऊत आदींची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांचे छोटे रोपटे देऊन तसेच शाल व श्रीफळाने स्वागत करण्यात आले. यानंतर उपस्थित हजारो विद्यार्थ्यांना मातीचा गोळा व खपटाचा पुठ्ठा देऊन मातीपासून गणेशमूर्ती बनवण्याचे प्रशिक्षण रोहिणी नायगावकर यांनी व्यासपीठावरून दिले.७ वी ते ११ वीतील विद्यार्थ्यांनी नायगावकर यांच्या सूचनांप्रमाणे मातीच्या गणेशमूर्ती बनवण्याचा प्रयत्न केला. यामध्ये अनेकांना सुबक मूर्ती साकारता आल्या तर काहींनी प्रयत्न केले. सकाळी ११.३० वाजता सुरू झालेली ही कार्यशाळा तब्बल दीड ते दोन तास सुरू होती. सदरील कार्यशाळा सकाळी ११ वाजता इयत्ता आठवी ते ११ वीच्या विद्यार्थ्यांसाठी तर दुपारच्या सत्रात इयत्ता ५ वी ते ७ वीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केली होती. सकाळच्या सत्रात कला शिक्षक शेषनाथ वाघ व शिक्षक संदीप जगताप यांनी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या गणेशमूर्तींचे परीक्षण केले. आकर्षक मूर्तीं बनवणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षिसेी ठेवण्यात आली. सकाळच्या सत्रातून २५ तर दुपारच्या सत्रातून ६२ जणांची निवड करण्यात आली.
साडेचार हजारांवर विद्यार्थी रममाण
दोन सत्रांमध्ये ४ हजार ९५० विद्यार्थ्यांनी कार्यशाळेत सहभाग नोंदवला. सकाळच्या सत्रात इयत्ता आठवी ते ११ वीचे २ हजार ९५० विद्यार्थी सहभागी झाले तर दुपारच्या सत्रामध्ये पाचवी ते सातवीच्या २ हजार विद्यार्थी इको फ्रेंडली गणेशमूर्ती घडवण्यात रममाण झाले होते.
चार दिवसांपासून तयारी
या कार्यशाळेसाठी “दिव्य मराठी’सह सहभागी आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ, व्यापारी महासंघ, एकता फाउंडेशन, शिवशाही युवा प्रतिष्ठान, युवा आधार प्रतिष्ठान, संस्कृती प्रतिष्ठान, भागीरथी परिवाराकडून चार दिवसांपासून नियोजन करण्यात येत होते. मूर्ती घडवण्यासाठी ४ ट्रॅक्टर काळी माती तसेच दोनशेवर पुठ्ठे मागवण्यात आले होते. सकाळी प्रथम पुठ्ठ्यांचे तुकडे करून तसेच मातीचे गोळे तयार करून विद्यार्थ्यांना देण्यात आले.
आतापर्यंत ७ हजारांवर विद्यार्थ्यांना प्रशिक्षण
‘दिव्य मराठी’च्या मातीचे गणपती अभियानांतर्गत उस्मानाबाद शहरासह ग्रामीण भागातही कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहेत. त्यानुसार यापूर्वीच्या कार्यशाळेतून दोन हजारावर विद्यार्थ्यांना गणेशमूर्ती बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. चिकुंद्रा येथे अायोजित कार्यशाळेत अडीचशे जणांनी सहभाग घेतला तर गुरुवारी जिल्ह्यातील सर्वात मोठ्या कार्यशाळेत साडेचार हजारावर विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
आदर्श शिक्षण संस्थेतील शिक्षकांचे सहकार्य
गुरुवारी भोसले हायस्कूल येथे आयोजित कार्यशाळेसाठी मुख्याध्यापक एस. एस. पडवळ, उपमुख्याध्यापक सिद्धेश्वर कोळी यांच्यासह पर्यवेक्षक एस. व्ही. सुरवसे, नाना हाजगुडे, वा. के. इंगळे, के. पी. पाटील शिक्षक पी. एन. पाटील,एस. एस. जाधव, अार. पी. पवार, आर. बी. चौधरी, भोसले, टी. पी. शेटे, शेषनाथ वाघ यांच्यासह संस्थेतील दोनशेवर शिक्षकांचे मोलाचे सहकार्य लाभले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment