0
परभणी- वर्षभरापूर्वी लग्न सोहळ्यात पडलेले पैशाचे पाकीट एका युवकाने खिशात घातले. मात्र दुसऱ्या सातवर्षीय बालकाने प्रामाणिकपणे ही घटना सांगितल्याने त्या युवकाला काही जणांनी मारहाण केली. हाच राग मनात धरून त्या युवकाने बालकाच्या मोठ्या भावाशी मैत्री करत सूड उगवला. संधी साधून त्या बालकाचा दगडाने ठेचून खून केला. पोलिसांनीही या घटनेत तपासाची चक्रे वेगाने फिरवत खून करणाऱ्या युवकाला २४ तासांच्या आत जेरबंद केले.जिंतूर शहरातील शिवाजीनगर भागातील युवराज अशोक जाधव(७) याचा गुरुवारी(दि.२०) दुपारी दगडाने ठेचून खून करण्यात आला होता. सुरुवातीस त्याची ओळख पटत नव्हती. बालकाचा फोटो पोलिसांनी शहरातील व ग्रामीण भागातील व्हॉट्सअॅप ग्रुपवर प्रसारित केला. त्यामुळे काही वेळातच युवराजचे वडील अशोक जाधव यांनी ग्रामीण रुग्णालय गाठले. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीला अटक होईपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका नातेवाइकांनी घेतली. त्यामुळे शुक्रवारी सकाळी नऊ वाजेपर्यंत युवराजचा मृतदेह रुग्णालयातच होता. आराेपीच्या अटकेनंतरच त्याचे पार्थिव नातेवाइकांनी ताब्यात घेतले.

गुन्ह्याची दिली कबुली 
जिंतूर तालुक्यातील दहेगाव येथील रहिवासी असलेले अशोक जाधव हे सध्या शहरातील शिवाजीनगरात वास्तव्यास आहेत. त्यांचा मुलगा युवराज हा इयत्ता दुसरीत विद्यापूर्ती शाळेत शिक्षण घेत होता. अवघ्या सात वर्षांच्या युवराजचा खून कोणी केला असेल या तर्कविर्तकास सुरुवात झाली. पोलिसांनी तीन पथके स्थापन करून २४ तासांच्या आत आरोपीचा छडा लावला. शिवाजीनगर येथून अारोपी अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले. त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

पाकीट पकडून दिल्याचा राग धुमसत होता 
शहरातील माउली मंगल कार्यालयात मागील वर्षी एका विवाह सोहळ्यात अल्पवयीन युवकाने एका व्यक्तीचे पडलेले पैशाचे पाकीट स्वतःकडे ठेवले होते. युवराजने निरागसपणे संबंधित व्यक्तीला ते पाकीट एका युवकाकडे असल्याची माहिती दिली. त्यामुळे त्या व्यक्तीने युवकाला मारहाण केली होती. या मारहाणीचा राग मंगेशच्या डोक्यात होता. त्याने युवराजवर सूड उगवण्याचे ठरवले होते. त्यादृष्टीने संधी मिळत नसल्याने त्याने युवराजचा मोठा भाऊ पवन जाधव याच्याशी मैत्री केली. या मैत्रीच्या माध्यमातून त्याने युवराजच्या घरी जाण्यास सुरुवात केली. त्याचबरोबर त्याने युवराजशीही जवळीक साधत गुरुवारी त्याने युवराजला दगडाने ठेचून जिवे मारले.
Jintur District Parbhani Murder Case Update

Post a comment

 
Top