धुळे- मुंबई-आग्रा महामार्गावरील शहापूरजवळ धुळे शहरातील व्यापाऱ्यांच्या वाहनाला भीषण अपघात झाला. या अपघातात काँग्रेसचे नगरसेवक तसेच व्यावसायिक कुमार डियालानी यांच्यासह तीन जण ठार झाले, तर इतर दोघांची प्रकृती गंभीर आहे. दुचाकीस्वारास वाचवण्याच्या नादात हा अपघात झाला. त्यांची कार दोन-तीन वेळा कलंडून दरीत कोसळली.
कुमारनगरमधील भाजीपाला मार्केटपासून जवळ असलेल्या नरोत्तम निवास येथून शुक्रवारी सकाळी नगरसेवक कुमार डियालानी, ललितकुमार मनोहरलाल भारद्वाज ऊर्फ लखू महाराज, राजकुमार सुंंदरलाल बठिजा, रमेश कुकरेजा तसेच सेवानिवृत्त पोलिस कर्मचारी पाटील हे मुंबईला जाण्यासाठी निघाले. पांढऱ्या रंगाच्या कारमधून (एमएच १८/एजे ७२२८) त्यांचा प्रवास सुरू झाला. मुंबई आग्रा महामार्गावरील शहापूरजवळच्या अाडगाव रेल्वेस्टेशननजीक त्यांची कार दोन ते तीन वेळेस उलटून दरीत कोसळली. एका मोटारसायकल चालकाला वाचवण्याच्या नादात हा अपघात झाला. या अपघातात लखू महाराज, राजू बठिजा हे जागीच ठार झाले, तर नगरसेवक डियालानी यांचा रुग्णालयात मृत्यू झाला. याशिवाय रमेश कुकरेजा व पाटील हे गंभीर जखमी झाले. त्यापैकी पाटील यांची प्रकृती चिंताजनक अाहे. त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे, अशी माहिती अपघातानंतर घटनास्थळाकडे रवाना झालेल्या काही समाजबांधवांनी दिली.
मुलीचे ठरवले लग्न
डियालानी यांना दोन मुले व एक मुलगी आहे. काही दिवसांपूर्वी नगरसेवक कुमार यांनी आपल्या मुलीचे लग्न ठरवलेे होते. शिवाय लग्नाच्या नियोजनाबद्दल घरात चर्चा सुरू होती. त्यापूर्वीच ही घटना घडली. राजू बठिजा यांना एक मुलगा व मुलगी आहे. दोघेही विवाहित आहेत. लखू महाराजांना दोन मुली व एक मुलगा आहे. डियालानी यांचे आग्रा रोडला घड्याळाचे दुकान आहे. अवघ्या काही दिवसांपूर्वी आग्रा रोडला नवीन कपड्याचे शोरूमही सुरू केले आहे.

Post a Comment