0
लखनऊ - आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पार्टीच्या विरोधात महाआघाडीसाठी विरोधकांचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र सन्मानाने जागा मिळाल्या तरच बसपा आघाडीत सहभागी होईल, असे बसपाप्रमुख मायावती यांनी स्पष्ट केले. रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.
 • भाजपविरोधी आघाडीला बसपाचा विरोध मुळीच नाही. पण आम्हाला सन्मानपूर्वक जागा हव्या आहेत. त्यात तडजोड चालणार नाही. पक्षाला अशा जागा मिळाल्या तर आघाडीसाठी आक्षेप नाही. अन्यथा बसपा निवडणुकीच्या मैदानात स्वबळावर उतरणार आहे. मायावतींनी भाजपवर टीका केली. भाजप केवळ आश्वासने देण्याचे काम करतो. आता भाजप नेत्यांच्या आश्वासनांना आेहोटीचे दिवस लागले आहेत. चुकीच्या धोरणांमुळे देशाची आर्थिक स्थिती बिघडली आहे. बेरोजगारीचा फटका लोकांना बसला आहे. लोकसभा निवडणुकीत या पक्षाचे अस्तित्वही राहणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. लोकसभा व तीन राज्यांची विधानसभा निवडणूक जवळ येताच भाजप पुन्हा आकर्षित करणारी आश्वासने देण्यावर भर देते. तशाच प्रकारची रणनीती राबवली जाते. अपयश व वाईट कामांवर पडदा टाकण्यासाठी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावाचा वापर केला जात आहे. माजी पंतप्रधान हयात होते तोपर्यंत भाजपने त्यांच्याकडून काहीही शिकण्याचा प्रयत्न केला नाही. आता भाजप त्यांच्या निधनानंतर त्यांची शिकवण सांगत फिरू लागला आहे, असा टोला मायावतींनी लगावला.

  रावणाला आेळखत नाही, मागास-गरिबांशी जवळचे नाते 
  पश्चिम उत्तर प्रदेशात वेगाने पसरत चाललेल्या भीम आर्मीच्या वैधतेवर मायावतींनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अशा गोष्टींपासून सावध राहिले पाहिजे. खरे तर गरीब-दलितांच्या कल्याणासाठी काम करणे अपेक्षित आहे. पण काही लोक आपल्या स्वार्थासाठी समुदायाची फसवणूक करू लागले आहेत. वेगळ्या संघटना स्थापन करण्याऐवजी बसपाच्या ध्वजाखाली समुदायासाठी लढाई लढली पाहिजे, असे मायावतींनी सुचवले.

  ...तर मुलायम मोर्चाचे अध्यक्ष : शिवपाल 
  बाराबंकी ।
   मुलायमसिंह यांनी तयारी दर्शवल्यास त्यांना समाजवादी सेक्युलर मोर्चाचे अध्यक्ष केले जाऊ शकते, असे मोर्चाचे संस्थापक शिवपालसिंह यादव यांनी रविवारी स्पष्ट केले. आता पावले पुढे पडली आहेत. मागे येण्याचा प्रश्न नाही. लवकरच नवीन पक्ष व पक्ष चिन्हासाठी निवडणूक आयोगाकडे अर्ज केला जाईल. समाजवादी पार्टीच्या पक्षाच्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत सहभागी करून घेतले जात नव्हते. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला, असे शिवपाल यांनी सांगितले.

  बंगल्यासाठी भाजपचे मानले आभार 
  मायावतींनी रविवारी ९ अॅव्हेन्यू येथे खासगी बंगल्यात गृहप्रवेश केला. त्याचे श्रेय मायावतींनी समर्थक, भाजपलाही दिले. उच्च न्यायालयाच्या आदेशावरून मला सरकारी बंगला सोडावा लागला होता. त्यानंतर मी लखनऊ व दिल्लीत बंगले बांधले. बंगले बांधण्यासाठी समर्थकांनी पैसा उभा केला. भाजपसोबतच्या आघाडीतून बाहेर पडल्यानंतर तत्कालीन वाजपेयी सरकारने दबाव आणला होता. माझ्या नातेवाइकांवर कारवाई केली होती. त्यातून प्रेरणा घेऊन नवीन बंगला बांधता आला. त्याबद्दल भाजपचेही आभार, असा टोला त्यांनी लगावला. याप्रसंगी मायावतींनी नवीन बंगला पत्रकारांनाही दाखवला. त्याची माहिती दिली.
  Mayawati Demanded good number of seats for Coalition of opposition

Post a Comment

 
Top