- आशियाबाहेर कसोटी क्रिकेट खेळताना भारताची बहुतेकदा घसरगुंडीच उडते. खरे तर सध्याचा भारतीय क्रिकेट संघ जागतिक कसोटी क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर मिरवतो. एकदिवसीय क्रिकेट क्रमवारीत भारत दुसऱ्या क्रमांकावर आणि टी-ट्वेंटीतही जगात दुसऱ्या स्थानावर आहे. ही क्रमवारी पाहिल्यावर भारतीय क्रिकेट बलाढ्य वाटणे स्वाभाविक आहे. पण यातला चकवा असा की, अलीकडच्या काही महिन्यांमध्ये भारत आशियाच्या बाहेर फारसा खेळलेला नाही. आशियाई खेळपट्ट्यांवर भारतीय फलंदाजांची दादागिरी चालते, फिरकीची कलाकारीही आशियात चालते. आशियाबाहेरच्या खेळपट्ट्यांवर याच बलाढ्य वीरांच्या शेळ्या होतात. म्हणून तर इंग्लंडमध्ये चालू कसोटी मालिका ३ विरुद्ध १ अशी गमावल्यानंतर इंग्लिश क्रिकेट चाहते कुत्सितपणे म्हणाले, की इंग्लंड विरुद्ध भारत ही मालिका 'मेन विरुद्ध बॉइज' अशी होती. हा इंग्रजांचा अतिशयोक्त आगाऊपणाच म्हणायचा.
भारत हरला हे खरे पण भारताने सामने बहाल केले नाहीत. विजयासाठी इंग्लंडला झगडावे लागले. म्हणून तर इंग्लंडच्या प्रशिक्षकांनी भारताविरुद्धच्या मालिकेची बरोबरी अॅशेसशी करावी, इंग्लंड कर्णधाराने भारताविरोधातला मालिका विजय कारकीर्दीतला सर्वोत्तम म्हणावे यात सर्व काही आले. प्रतिस्पर्ध्यांनी केलेले कौतुक केवळ आणि केवळ विराट कोहली या संघनायकाच्या एकाकी जिगरबाज फलंदाजीचे आणि कधी नव्हे इतक्या तिखट भारतीय वेगवान माऱ्याचे आहे. विराटने चार सामन्यांत एकट्यानेच ५४४ धावा काढल्या. भारतीय गोलंदाजांनी चारही सामन्यांत इंग्लंडला दोन्ही डावांत गुंडाळण्याची अशक्यप्राय कामगिरी केली. विराट हा जगातला क्रमांक एकचा फलंदाज का आहे, याचेच दर्शन घडले. इंग्लिश वातावरणात टिच्चून गोलंदाजी करणाऱ्या ईशांत शर्मा, मोहंमद शमी, बुमरा यांचे करावे तितके कौतुक कमीच.
दमदार म्हणवणाऱ्या फलंदाजीने खरा घात केला. ज्या इंग्लिश गोलंदाजांपुढे विराट समर्थपणे उभा राहतो, त्यापुढे इतरांना टिकाव धरता येत नाही. फिरकी खेळात मोठे झालेले भारतीय, त्याच फिरकीपुढे ऐन मोक्याच्या वेळी ढेपाळतात. मोईन खानच्या फिरकीपुढे शरणागती पत्करण्यासाठी तो शेन वॉर्न किंवा मुथय्या मुरलीधरन नक्कीच नाही. भारतीय फलंदाजांचे तंत्र आणि मनोधैर्य कुचकामी ठरले हेच खरे. ऑस्ट्रेलियाने फॉलोऑन दिल्यानंतरही लक्ष्मण-द्रविड या जोडीने ३७६ धावांची अशक्यप्राय भागीदारी केली. धीरोदात्तपणा, निर्धार, जिगर म्हणजे काय हे सांगणारे असे कित्येक रोमहर्षक दाखले भारतीय क्रिकेटमध्ये आहेत. सध्याच्या संघातल्या फलंदाजांमध्ये ही विजिगीषू वृत्ती विराट वगळता दिसत नाही.भारतातल्या मुर्दाड खेळपट्ट्यांवर टोले लगावणे वेगळे आणि थंड, बोचऱ्या हवेत हलणाऱ्या चेंडूचा सामना करणे वेगळे. आर. अश्विननेही मोक्याच्या वेळी मान टाकली. रवी शास्त्री आणि संजय बांगर हे सुमार प्रशिक्षक असल्याचा माजी क्रिकेटपटूंचा दावा अाता खरा वाटतो अाहे. प्रशिक्षकांचे अस्तित्व ना संघ निवडीत दिसले, ना मैदानी डावपेच ना कामगिरीत. टी-ट्वेंटीतून उदयाला आलेला हार्दिक पंड्या कसोटी क्रिकेटमध्ये चक्क अष्टपैलू म्हणून खेळतो, जायबंदी आर. अश्विनला खेळवण्याचा अट्टहास धरला जातो, किती गोलंदाज आणि किती फलंदाज खेळवावे यासारख्या अनेक चुकांबद्दल प्रशिक्षकांना जबाबदार धरावे लागते. फलंदाज म्हणून 'दी ग्रेट' होण्याकडे वाटचाल करणारा विराट कोहली कर्णधार म्हणून सामान्य असल्याचेही सिद्ध होत आहे. अर्थात केवळ दोषारोपाने प्रश्न सुटत नाहीत. कोणताच भारतीय संघ इंग्लंडमध्ये आजवर सातत्य दाखवू शकलेला नाही. १९७० च्या दशकात अजित वाडेकरांच्या संघाने पहिल्यांदा इंग्रजांना इंग्लिश भूमीत हरवण्याचा पराक्रम गाजवला. १९८६ मध्ये कपिल देवच्या संघाने त्याची पुनरावृत्ती केली. त्यानंतर इंग्लंडमधला कसोटी मालिका विजय साजरा करण्यासाठी २००७ मधल्या राहुल द्रविडच्या संघाची वाट पाहावी लागली.
इंग्लंडच कशाला, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या देशांमध्येही अजून भारत कसोटी क्रिकेट मालिका जिंकू शकलेला नाही. अर्थात आजच्या भारतीय संघाला उपलब्ध होणाऱ्या सोयी-सुविधा आणि मानधनाची तुलना यापूर्वीच्या कोणत्याच संघाशी करता येणार नाही. त्यामुळेच सध्याच्या भारतीय संघातले मूलभूत दोष चटकन अंगावर येतात. भारताच्या विश्वविक्रमी तंत्रशुद्ध फलंदाजीला टी-ट्वेंटीचे ग्रहण लागल्याचे कधीतरी प्रामाणिकपणे मान्य करावे लागेल. देशी स्पर्धांमध्ये हिरव्यागार वेगवान खेळपट्ट्या उपलब्ध करून देण्यात अडचण काय आहे? परकीय वातावरणात दीर्घ सराव केल्याशिवाय निभाव लागत नसल्याचा सर्व पाहुण्या संघांचा अनुभव आहे. बीसीसीआयला या गोष्टी समजत नाहीत असे कसे म्हणावे? येत्या वर्षात ऑस्ट्रेलियात जाऊन खेळायचे आहे. पुढच्या वर्षी पुन्हा इंग्लंडमध्येच एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा आहे. 'बीसीसीआय'ने शक्य तितक्या लवकर जागे व्हावे हे बरे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment