वॉशिंग्टन- अमेरिकी संसदेच्या कनिष्ठ सभागृहाने कुत्रे व मांजरीचे मांस खाण्यावर बंदी घालणारे विधेयक संमत केले आहे. भारत, चीन, दक्षिण कोरिया आणि व्हिएतनाममध्येही या दोन पाळीव प्राण्यांचा वध रोखण्याचे आवाहन अमेरिकेने केले आहे. या विधेयकाच्या मसुद्यात म्हटले आहे की, दयाळू समाजात कुत्रे व मांजराचे मांस भक्षण बंद झाले पाहिजे. यामध्ये या प्राण्यांची कातडी व केसांचा व्यापार बंद करण्याचाही उल्लेख आहे.
विधेयकात भारत, चीन, दक्षिण कोरिया, व्हिएतनाम, थायलंड, फिलिपाइन्स, इंडोनेशिया, कंबोडिया, लाआेस आणि इतर देशांच्या सरकारांना आवाहन केले आहे की, त्यांनी कुत्रे व मांजराच्या मांसविक्रीचा व्यापार बंद करावा. तसे कायदे या देशांनी मंजूर करून घ्यावेत, असाही अमेरिकी कनिष्ठ सभागृहाचा आग्रह आहे.
यासोबतच अमेरिकी संसदेने एक विधेयक संमत केले आहे. अमेरिकी नागरिकांनी भोजनात या प्राण्यांचे मांस घेऊ नये. कुत्रे, मांजर मांस व्यापार निषेध अधिनियम -२०१८ मध्ये या पाळीव प्राण्यांचा वध, मांस व्यापार करणाऱ्यांविरुद्ध ३.५० लाख रुपयांच्या दंडात्मक कारवाईची तरतूद केली आहे. अमेरिकी संसदेच्या या प्रस्तावावर काँग्रेस सदस्य क्लाउडिया टेनी यांनी म्हटले की, 'कुत्रे व मांजर सोबत ठेवण्यासाठी व मनोरंजनासाठी असतात. दुर्दैवाने चीनमध्ये दरवर्षी माणसाच्या आहारासाठी १ कोटी कुत्रे व मांजर मारले जातात. या प्राण्यांसाठी आपल्या कारुण्यमय मानवी समाजात काहीच स्थान नाही. हे विधेयक अमेरिकी मूल्यांना दर्शवणारे आहे. सर्व देशांना यातून एक कठोर संदेश दिला जात आहे की, 'अमेरिका अमानवीय आणि क्रूर वागणुकीला साथ देणार नाही.'
ईशान्य भारतात कुत्र्याचे मांस आहाराचा भाग
भारताच्या ईशान्येकडील राज्यांमध्ये कुत्र्याचे मांस खाणे सर्वसामान्य बाब आहे. नागालँड, मिझोराम, मणिपूरमध्ये तर काही समुदायांचे हे दैनंदिन अन्न आहे.
Post a Comment