0
मुंबई- कोणत्याही निवडणुकीपूर्वी मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी तसेच आवाहनासाठी निवडणूक आयोगाकडून एखाद्या अभिनेता, अभिनेत्री किंवा अन्य सेलिब्रिटींची अॅम्बेसेडर म्हणून निवड केली जाते. मात्र, यापुढे त्यांची निवड करताना निवडणूक आयोग सावध पवित्र्याच्या भूमिकेत आहे.
  • मागच्या निवडणुकीवेळी आयोगाने “सैराट’मुळे घरोघरी पोहोचलेल्या आकाश ठोसर (परशा) आणि रिंकू राजगुरू (आर्ची) यांची या मोहिमेसाठी अॅम्बेसेडर म्हणून निवड केली होती. परंतु, नुकताच आकाश, रिंकूसह सैराटचा दिग्दर्शक नागराज मंजुळेने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चित्रपट संघटनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे यापुढे आयोगाला त्यांचा मतदार जनजागृतीसाठी उपयोग करता येणार नाही.

    नेमकी हीच गत वारंवार होत असल्याने यापुढे सेलिब्रिटी निवडताना बरीच सावधगिरी बाळगावी लागेल. कोणत्याही राजकीय संघटनेशी संबंधित नसलेल्या सेलिब्रिटींची निवड करावी लागेल, अशी चिंता राज्याच्या निवडणूक आयोगाकडून बुधवारी व्यक्त करण्यात आली. आधीच्या जनजागृती मोहिमेत अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, वैज्ञानिक अनिल काकोडकर, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश आमटे, नेत्ररोगतज्ज्ञ तात्याराव लहाने यांनी सहभाग नोंदवला होता.
    बहुतांश सेलिब्रिटी चित्रपट संघटनांत
    मराठी चित्रपट सृष्टीतील अनेक कलावंत विविध संघटनांमध्ये सक्रिय आहेत. त्यांच्यापैकी बहुतांश महाराष्ट्र नवनिर्माण सेना किंवा शिवसेनेच्या चित्रपट संघटनांमध्ये सहभागी आहेत. अभिनेता महेश मांजरेकरांनी मनसेकडून निवडणूक लढवली होती, तर आदेश बांदेकर सध्या शिवसेनेकडून सिद्धिविनायक मंदिराच्या विश्वस्त मंडळावर अध्यक्ष आहेत. शिवाय, अनेक अन्य कलाकारांनीही राजकीय वाट निवडलेली आहे. बॉलीवूडमधील अनेक कलाकारसुद्धा अशा संघटनांमध्ये कार्यरत आहेत.

    यंदा १ सप्टेंबर ते ३१ ऑक्टोबरपर्यंत मोहीम 
    यंदा निवडणुकीसाठीच्या मतदार यादीत नवीन मतदारांचा समावेश, नाव, पत्ता आदींमध्ये दुरुस्ती करण्यासाठी १ सप्टेंबर ते ३१ ऑक्टोबर या काळात आयोगाने मोहीम हाती घेतली आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्यात १३.६ लाख नवे मतदार जोडले गेले होते. एकूण मतदारसंख्या ८.४९ कोटींच्या घरात असल्याचे आयोगाने सांगितले आहे.

    आर्ची, परशामुळे युवा मतदार आकर्षित 
    निवडणूक आयोगाच्या मते, आकाश आणि रिंकू हे प्रचंड लोकप्रिय असल्याने त्यांच्याविषयी युवकांत आकर्षण आहे. याचा फायदा मागच्या निवडणुकीवेळी जनजागृतीसाठी झाला. रिंकूने वयाची १८ वर्षे पूर्ण न केल्याने काहीशी अडचण होती. मात्र, २५ जानेवारीच्या मतदार दिनाच्या पार्श्वभूमीवर त्यांची निवड झाली व त्यांच्यामुळे युवा मंडळी या प्रक्रियेत सामील झाली
    .Brand Ambassador of election commission enter in MNS

Post a Comment

 
Top