इराणसाठीदेखील चीननंतर भारतच सर्वात मोठा ग्राहक देश आहे. अमेरिकेच्या या बंधनांमुळे जागतिक बाजारात कच्चे तेल महाग होण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास भारतीय बाजारात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत आणखी वाढ होईल.
या दरम्यान सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारतीय अधिकारी तसेच अमेरिकी अधिकाऱ्यांमध्ये यासंदर्भात चर्चा सुरू आहे. मात्र, जर अमेरिका याविषयी सहमत झाला नाही तर इराणमधून आयात बंद केल्याशिवाय भारताकडे दुसरा पर्याय राहणार नाही. मागील आठवड्यात दिल्लीत आलेले अमेरिकी विदेशी मंत्री माइक पॉम्पिओ यांनी भारतासारख्या देशाच्या आग्रहावर विचार केला जाऊ शकतो, असे म्हटले होते. मात्र, भारताला इराणकडून कच्च्या तेलाची खरेदी बंद करावीच लागणार आहे.
पुरवठ्यावर परिणाम नाही
भारत गरजेच्या सुमारे १० टक्के कच्चे तेल इराणमधून आयात करतो. अमेरिकेने बंधने घातल्यानंतरही भारताच्या तेल आयातीवर याचा परिणाम होणार नसल्याचे ऊर्जा क्षेत्रातील तज्ज्ञ नरेंद्र तनेजा यांनी म्हटले आहे. भारताने यासंदर्भात सौदी अरेबिया आणि इराकसोबत चर्चा केली असून हे देश भारताला अतिरिक्त तेल देण्यास तयार आहेत. मात्र, यामुळे देशात आयात होणाऱ्या कच्च्या तेलाच्या आयातीच्या दरात वाढ होईल. कच्च्या तेलाचे उत्पादक असलेल्या देशांची संघटना ओपेकनुसार या संधीचा फायदा घेतला जाऊ शकतो. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर ७८ डॉलर प्रति बॅरलच्या वर गेले आहेत. बुधवारी हे ८०.१३ डॉलरपर्यंत पोहोचले होते. या आधी याच वर्षी मे महिन्यामध्ये कच्चे तेल या पातळीपर्यंत महाग झाले होते.
Post a Comment