0
मुंबई- मतदारसंघातील गणेश मंडळाच्या भेटीत ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष केल्याने भायखळ्याचे एमआयएम आमदार वारिस पठाण यांनी मुस्लिम समाजाची माफी मागितली. पठाण यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मुस्लिम समाजात नाराजीचा सूर होता. हिंदू देवतेचा जयघोष केल्याने पठाण यांनी समाजाची माफी मागावी, अशी मागणी होत होती. असदुद्दीन ओवेसी यांनीही पठाण यांच्याकडे नाराजी व्यक्त केल्याचे समजते. अखेर मंगळवारी पठाण यांनी माफीचा व्हिडिओ जारी केला.


आधी गणपती बाप्पा मोरया 
पठाण यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या मतदारसंघातील गणेश मंडळाला भेट दिली होती. कार्यकर्त्यांसमोर एका छोटेखानी भाषणात ‘गणपती आपल्या मार्गातील विघ्ने दूर करून आपल्याला आनंद प्रदान करेल’ अशा शुभेच्छा व्यक्त करत ‘गणपती बाप्पा मोरया’ असा जयघोषही पठाण यांनी केला होता.

... आता मागितली माफी
माफीच्या व्हिडिओत पठाण आपली चूक झाल्याचे मान्य करत अल्लाहने आपल्याला माफी द्यावी, असे आवाहन करत आहेत. आपण सर्वसामान्य व्यक्ती असून चूक होऊ शकते, असे सांगतानाच समाजानेही आपल्याला माफ करावे, यापुढे अशी चूक होणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले.
गणपती बाप्‍पा मोरया म्‍हटल्‍याने धर्म बदलतो का? माफीवर शिवसेनेची टीका 
गणपती बाप्पा मोरया म्हणण्यासाठी माफी का मागितली? गणपती बाप्पा मोरया म्हणाले तर त्यात काय बिघडले? त्यांनी काही गुन्हा केला आहे का? असे प्रश्‍न वारीस पठाण यांच्‍या माफीनाम्‍यानंतर शिवसेनेचे नेते अरविंद सावंत यांनी विचारले आहेत. पठाण यांच्‍या माफीचा आपण निषेध करतो, असे त्‍यांनी म्‍हटले आहे. तसेच 'अनेक हिंदू मशिदीत जातात, अजमेरला जातात. मग त्यामुळे त्यांचा धर्म बदलतो का?' असा सवालही त्यांनी वारीस पठाण यांच्‍यावर टीका करणा-यांना विचारला आहे.

ट्विटरवर व्हिडिओ पोस्‍ट करून वारीस पठाण यांनी माफी मागितली आहे.

  • MIM MLA waris pathan apologises for chanting ganapati baoppa morya

Post a comment

 
Top