भाजप पक्षात अमित शहा आणि पंतप्रधान मोदी यांचा काय धाक आहे याची अप्रयत्क्ष कबुलीच प्रदेशाध्यक्ष दानवेंनी दिली.

मुंबई - भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यसमितीच्या बैठकीला बुधवारपासून मुंबईत सुरूवात झाली. बैठकीला राज्यातील जवळपास साडेपाचशे प्रतिनिधी आणि लोकप्रतिनिधी यांनी हजेरी लावली आहे. गुरूवारी रंगशारदा सभागृहात पार पडलेल्या बैठकीला राज्याचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि पियुष गोयल उपस्थित होते.
यावेळी पदाधिका-यांना मार्गदर्शन करताना रावसाहेब दानवे यांनी पंतप्रधान मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या धाकाची अप्रत्यक्ष कबुली दिली. ते म्हणाले, 'आदेश आला तर कोंबड्यालाही अंडे द्यावेच लागेल. तुम्हाला जे सांगितल आहे तसे करावे लागेल आणि घडवून आणावे लागेल. हे चांगल्या पद्धतीने समजून घ्या. दुसरा पर्याय नाही.' त्यांचे हे वाक्य ऐकून उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकला होता.
खडसेंनी स्वत:हून राजीनामा दिला
आपल्या पक्षावर 4 वर्षात एकही भ्रष्टाचाराचा आरोप सिद्ध होऊ शकला नाही, असे रावसाहेब दानवे यांनी बैठकीतनंतर आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. त्यावर एकनाथ खडसेंना भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे राजीनामा का द्यावा लागला, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता खडसेंनी स्वत:हून राजीनामा दिला, असे उत्तर दानवे यांनी दिले. ते म्हणाले, 'पक्षाने त्यांना राजीनामा मागितला नव्हता. या आरोपांची चौकशी होईपर्यंत आपण मंत्रीपदावर राहू इच्छित नाही, असे म्हणत त्यांनी राजीनामा दिला होता.' एकनाथ खडसेंना पुन्हा मंत्रीपदावर घेणार का? असा प्रश्न विचारला असता, 'जेव्हा मंत्रीमंडळ विस्ताराचा निर्णय होईल तेव्हा याबद्दल विचार केला जाईल', असे दानवे यांनी सांगितले.
चौकशीनंतर मधु चव्हाणांबद्दल निर्णय
' म्हाडाचे अध्यक्ष आणि भाजपचे प्रवक्ते मधु चव्हाण यांच्यावर ज्या महिलेने बलात्काराचे आरोप केले आहेत, तिने एक वर्षापूर्वी याप्रकरणाची माझ्याकडेही तक्रार केली होती. त्यानंतर पोलिसांनी त्याची चौकशी केली असता, तक्रारीत काही तथ्य आढळले नव्हते. आता कोर्टाने या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. या चौकशीतून काय समोर येते, हे पाहावे लागेल. त्यानूसारच मधु चव्हाण यांच्याबद्दल निर्णय घेतला जाईल', असेही दानवे यांनी स्पष्ट केले.
Post a Comment