0
मुंबई/ नागपूर- महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या निवडणुकीत अहमदनगर जिल्ह्यातील सत्यजित सुधीर तांबे मोठे मताधिक्य प्राप्त करून प्रदेशाध्यक्ष झाले आहेत, तर विदर्भातील रिसोडचे आमदार अमित झनक आणि नागपूरचे कुणाल राऊत हे दोघे दुसऱ्या क्रमांकाची मते घेऊन उपाध्यक्ष झाले. या निवडणुकीत ६० युवकांची प्रदेश कार्यकारिणीवर निवड करण्यात आली आहे. तीन वर्षांसाठी या निवडी अाहेत.

 • सत्यजित तांबे यांना ७० हजार १८९ मते मिळाली, तर आमदार अमित झनक यांना ३२ हजार ९९९ आणि कुणाल राऊत यांना केवळ ७ हजार ७४४ मते पडली. राज्यात ९ व ११ आणि १२ सप्टेंबर रोजी या पदांसाठी मतदान पार पडले होते. नागपूर येथे शुक्रवारी मतमोजणी झाली व त्यामध्ये विजयी उमेदवार घोषित करण्यात आले. राज्यात २ लाख ५५ हजार मतदार होते. त्यातील ६० हजार ७०० केवळ उत्तर महाराष्ट्रात होते, तर तांबे यांच्या अहमदनगर जिल्ह्यातच तब्बल ३४ हजार इतके मतदार होते.

  सत्यजित तांबे यांच्या विजयानंतर संगमनेरच्या त्यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून जल्लोष केला. तांबे यांचा हा विजय निश्चित मानला जात होता. मात्र, आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युवक काँग्रेसमधील गटबाजी टाळण्याचा पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी प्रयत्न केला होता. त्यासाठी पुण्यामध्ये प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील, बाळासाहेब थोरात आणि मावळते युवक काँग्रेसचे अध्यक्ष विश्वजित कदम यांनी बैठक घेतली होती. पण, त्याला यश आले नाही. गेला महिनाभर काँग्रेस पक्षात युवक काँग्रेसच्या निवडणुकीवरून चांगलेच वातावरण तापले होते.

  बाळासाहेब थाेरातांचे तांबे भाचे- सत्यजित तांबे हे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचे भाचे आहेत. तसेच सत्यजित यांचे वडील डाॅ. सुधीर तांबे विधान परिषदेवर अामदार आहेत. तांबे यांनी २०१४ मध्ये अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती.

  पक्ष मजबूत करण्यास प्राधान्य
  तांबे- एनएसयूआयच्या माध्यमातून युवकांना संघटित करण्याचे काम तांबे गेली १५ वर्षे करत आहेत. त्यांनी दोन वेळा युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदाचे काम पाहिले आहे. शहरी विकास, आंतरराष्ट्रीय राजकारण आणि युवा सक्षमीकरण यामध्ये तांबे यांना अधिक रस आहे. ‘युवकांच्या माध्यमातून काँग्रेस पक्ष मजबूत करण्याच्या कामाला आपण प्राधान्य देणार अाहोत’, असे तांबे म्हणाले
  .Satyajit tambe elected as state president of youth congress Maharashtra

Post a comment

 
Top