- नागपूर- 'दलित' शब्द अवमानजनक नाही, तर 'उत्साह' देणारा असल्याचा दावा करत हा शब्द वापरण्यास मनाई करणाऱ्या प्रसारण मंत्रालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देऊ, असे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सांगितले.
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या निर्णयानंतर केंद्रीय प्रसारण मंत्रालयाने दलित शब्दाचा वापर करता येणार नाही, असे दिशानिर्देश जारी केले आहेत. दरम्यान, नागपुरात बोलताना आठवले म्हणाले, राज्यात रिपब्लिकन पक्षाला सत्तेत वाटा मिळायला सुरुवात झाली असून दोन महामंडळे मिळाली आहेत. आता आम्हाला दोन मंत्रिपदे हवी असून त्यासाठी अविनाश मातेकर आणि भूपेश थूलकर यांची नावे मुख्यमंत्र्यांना भेटून दिली आहेत.
दरम्यान, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी कितीही आकांडतांडव केले तरी केंद्रातील मोदी सरकार ३०० पेक्षा अधिक जागा जिंकून पुन्हा सत्तेवर येईल, असे म्हणत येत्या निवडणुकीत राज्यात भाजप-शिवसेना-रिपाइं महायुती झाल्यास काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा टिकाव लागणार नाही, असा दावाही त्यांनी केला. शिवसेना व भाजप युतीसाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. मुंबईची दक्षिण-मध्य लोकसभा मतदारसंघातून माझी लढण्याची इच्छा आहे. युती झाली नाही तरी या मतदारसंघातून आपण लढणारच आहोत, असे सांगताना लोकसभा निवडणुकीत रिपाइं दोन जागांची मागणी करणार आहे. विधानसभेत युती झाल्यास १२ ते १३ जागांची किंवा न झाल्यास २५ जागांची आमची मागणी राहील, असे आठवले म्हणाले.
सवर्णांशी चर्चा करण्याची तयारी
सध्या देशात अॅट्रॉसिटी कायद्याविरोधात सवर्ण विरुद्ध दलित आंदोलन सुरू असल्याचे सांगताना आठवले म्हणाले की, यासंदर्भात सवर्णांशी चर्चा करण्याची आपली तयारी आहे. कायद्याचा दुरुपयोग होणार नाही, असा दावाही त्यांनी केला.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment