बुलडाणा- एका २६ वर्षीय विवाहितेची तिच्या दारुड्या पतीने राहत्या घरी धारदार शस्त्राने हत्या केल्याची घटना३० ऑगस्ट रोजी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास शहरातील शिवशंकर नगरमध्ये घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीस अटक केली आहे. या हत्येमागील कारणांचा पोलिस शोध घेत आहे.
नऊ ते दहा वर्षापूर्वी वैशाली व राहुल शंकर कांबळे यांचे लग्न झाले होते. दरम्यानच्या काळात त्यांच्या संसार वेलीवर आठ वर्षीय मुलगा तन्मय हे फुल उमलले आहे. हे कुटुंब सासरा शंकर कांबळे, सासू मंदाबाई कांबळे, दिर व जाऊसह एकत्र राहात होते. गेल्या ९ वर्षापासून पती राहुल हा पत्नी वैशालीला व्यसनाधिनतेमुळे सतत त्रास देत होता. दारू पिण्यावरून वैशाली व राहुलमध्ये पैशासाठी नेहमी भांडणे होत असत. कुटुंबाची गुजराण करण्यासाठी वैशाली ही एका खासगी अस्थापनेत काम करीत होती. पतीच्या सततच्या त्रासाला कंटाळून वैशाली मागील दोन महिन्यांपूर्वी माहेरी पळसखेड भट्ट येथे राहायला गेली होती. मात्र आई वडिलांनी तिला समजावून सासरी परत पाठवले. दरम्यान, वैशालीने आपल्या जीवाचे काही बरेवाईट होऊ शकते, अशी भीती आपल्या आईजवळ व्यक्त केली होती.अशातच ३० आॅगस्ट रोजी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास पुन्हा पती राहुल कांबळे याने वैशालीकडे दारुसाठी पैशांची मागणी केली. मात्र ही मागणी पूर्ण करण्यास नकार दिल्याने राहुलचा पारा चढला. यावेळी त्याने रागाच्या भरात वैशालीच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार केला. या मारहाणीत ती गंभीर जखमी झाली. त्यानंतर घाबरलेल्या राहुल व त्याच्या आई- वडिलांनी वैशालीला सामान्य रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
या घटनेची माहिती वैशालीच्या आई वडिलांना मिळताच त्यांनी बुलडाणा गाठले. त्यानंतर मृतक विवाहितेची आई निर्मला निकाळजे यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरुन शहर पोलिसांनी सासर कडील मंडळी विरोधात गुन्हा दाखल करून आरोपी पतीस अटक केली आहे. घटनेचा पुढील तपास एपिआय राजेश यादव, भागवत कऱ्हाडे, अशोक गाढवे, गजानन तायडे, माधव पेटकर, उमेश भुते, अमोल शेजोळ व अमोल खराडे हे करीत आहेत.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment