- बीड- २० हजारांत एक लाख रुपयांपेक्षा अधिक पैशांचा पाऊस पाडून देतो, गुप्तधन, जमिनीतून सोने काढून देतो म्हणत अघोरी पूजा करणाऱ्या भोंदूंचा दरोडा प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी भांडाफोड केला. समनापूर (ता. बीड) मधून ५ जणांना ताब्यात घेतले. दरम्यान, प्रयत्न करूनही पाऊस पडत नसल्याने ज्याच्या घरी ही पूजा करण्यात येत होती. त्यानेच नातेवाईकांमार्फत पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
राजाभाऊ अंबादास गोेरे (रा. समनापूर, ता. बीड) यांची काही दिवसांपूर्वी आळंदी येथे जाताना बाबासाहेब पोपट भाेंडवे ( रा. पेरणा फाटा, ता. हवेली, जि. पुणे) याच्याशी ओळख झाली होती. भोंडवे याने आपण जमिनीतून गुप्तधन, सोने काढून देतो. शिवाय पैशांचा पाऊसही पाडून देत असल्याचे राजाभाऊ यांना सांगितले होते. २० हजार रुपयांचा खर्च पाऊस पाडण्यासाठी येतो आणि एकदा पाऊस पडल्यास एक लाखाहून अधिक रक्कम त्यामध्ये पडते असे भोंडवे याने गोरेंना सांगितले. गोरे याने गुरुवारी रात्री समनापूर येथील आपल्या शेतवस्तीच्या घरी या पूजेचे आयोजन केले. भोंडवे याने सोबत भाऊसाहेब गाेपाळ गिरी (रा. बिलोनी, ता. वैजापूर, जि. औरंगाबाद), भगवान मसू माने, राहुल संजय वाळके, देवेंद्र भाऊदास वैष्णव यांना आणले होते. पाचही जणांनी गोरेंच्या घरी पहाटे दोन वाजेपर्यंत पूजा करूनही पाऊस पडत नसल्याचे लक्षात आल्यानंतर राजाभाऊ गोरे यांनी भाचा शंकर भोसले याला माहिती दिली. त्याने पोलिसांना ही माहिती दिली. यानंतर पोलिसांनी समनापूरमध्ये छापा मारून पाचही भोंदू बाबांच्या मुसक्या आवळल्या.
तीन दिवसांची न्यायालयीन कोठडी; अनेकांना गंडा घातल्याचा संशय
शुक्रवारी दुपारी ग्रामीण पोलिसांनी पाचही भोंदूबाबांना बीडच्या न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने पाचही जणांना तीन दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावल्याची माहिती ग्रामीण ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ यांनी दिली.
अन् ते फसवणुकीतून वाचले
राजाभाऊ गोरे यांच्याबरोबरच बीडमधील काही जणांनाही या टोळीने पैशांच्या पावसाचे आमिष दाखवले होते. पाऊस पडतो की नाही हे पाहण्यासाठी त्यांना समनापूरमध्ये गुरुवारी रात्री बोलावले होते. मात्र पाऊस पडला नाही उलट बाबाच पोलिसांच्या जाळ्यात सापडले अन् आमिषापोटी फसवणुकीच्या दारात असलेले ते यातून वाचले.
या टोळीने गुप्तधन, पैशांचा पाऊस, करणी, चेटूक करण्याच्या आमिषाने अनेकांना गंडा घातला असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्या दिशेने सध्या पोलिस तपास करत आहेत. तीन दिवसांच्या कोठडीत पोलिसांकडून त्यांची कसून चौकशी करण्यात येणार आहे. - भोंदूंनी असेे सोने काढतो म्हणून गोरेंना दाखवले.
- भोंदूंनी वापरलेली जीप.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment