0
 • बीड - मादळमोही (ता.गेवराई) हे छोटेसे गाव. येथील जि.प.कें.प्रा. शाळेतील विद्यार्थी परस्परांमध्ये तसेच अध्यापनादरम्यान इंग्रजीत उत्तमपणे संवाद साधतात. त्याचे कारण त्यांच्या शिक्षिका सुरेखा चिंचकर यांची सफाईदार इंग्रजी. तेजस प्रकल्पांतर्गत ‘टीचर्स अॅक्टिव्हिटी ग्रुप’मध्ये सहभागी झाल्याने सुरेखा चिंचकर यांच्याप्रमाणेच राज्यातील ९ जिल्ह्यांतील १३ हजार शिक्षक आज प्रभावीपणे विद्यार्थ्यांना इंग्रजीचे धडे देत आहेत.

  प्राथमिक शाळांतील इंग्रजी भाषेच्या अध्यापन प्रक्रियेची गुणवत्ता सुधारण्याच्या हेतूने महाराष्ट्र शासन, टाटा ट्रस्ट व ब्रिटिश कौन्सिल यांच्या पुढाकारातून दोन वर्षापूर्वी तेजस प्रकल्प हाती घेण्यात आला. पथदर्शी स्वरूपात राज्यातील बीड, औरंगाबाद, हिंगोली, नंदुरबार, नाशिक, यवतमाळ, गडचिरोली, नागपूर व अमरावती या नऊ जिल्ह्यांत प्रकल्पाचे काम सुरू झाले. या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यात साधारणपणे ३० टीचर्स अॅक्टिव्हिटी ग्रुप (टॅग) समन्वयक निवडण्यात आले. त्यासाठी विविध चाळणी परीक्षा घेण्यात आल्या. निवड झालेल्या समन्वयकांना दर महिन्यातून एकदा बैठक घेऊन प्रभावी अध्यापनासाठी तसेच भाषा सुधारण्यासाठी तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. टीचर्स अॅक्टिव्हिटी ग्रुपमध्ये मिळालेले मार्गदर्शन ‘टॅग’ समन्वयक त्याच्या भागात तीन ‘टॅग’ बैठका घेत ७५ शिक्षकांपर्यंत पोहोचवतो. या सर्व प्रक्रियेतून गेल्या तीन वर्षांत १३ हजार शिक्षकांच्या इंग्रजी बोलण्यात, लिहिण्यात आणि वाचण्यात सकारात्मक बदल घडून आला. शिक्षकांची इंग्रजी दर्जेदार झाल्याने व प्रभावी अध्यापन पद्धतीची अंमलबजावणी झाल्याने त्याचा फायदा थेट विद्यार्थ्यांना झाला. या प्रकल्पात सहभागी झालेल्या शिक्षकांच्या वर्गातील विद्यार्थी आज पायाभूत स्वरूपात उत्तमपणे इंग्रजीत संवाद साधत आहेत. गत महिन्यात ब्रिटिश कौन्सिलच्या टीमने विविध शाळांना भेटी देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला, त्यात विद्यार्थ्यांचा इंग्रजी शब्द संग्रह, शब्द नियोजन, इंग्रजीचे आकलन, संवाद साधण्याची पद्धत यात सकारात्मक बदल दिसून आल्याचे निरीक्षण ब्रिटिश कौन्सिलने नोंदवले आहे.

  टॅग समन्वयकांची अशी झाली निवड 
  तेजस प्रकल्पाचा पाया म्हणजे टॅग समन्वयक. तो नेमताना ब्रिटिश कौन्सिलने शिक्षक इंग्रजी शिकवणारा पाहिजे, त्याची शिक्षकांना शिकवण्याची इच्छा पाहिजे हे नियम ठेवले. शिवाय टेलिफोनिक मुलाखतीद्वारे निवड करण्यात आली. राज्यातील ३० साधन व्यक्तींच्या साथीने टॅग समन्वयकांनी नऊ जिल्ह्यात विद्यार्थ्यांच्या इंग्रजी भाषा सुधारणेसाठी प्रभावी प्रयत्न केले.

  यंदापासून राज्यात अंमलबजावणी
  ब्रिटिश कौन्सिल टीमने ‘तेजस’ सुरू होण्यापूर्वी निवड केलेल्या शाळांची गुणवत्ता तपासली होती. वर्षभरानंतर टॅग समन्वयक व विद्यार्थ्यांचे इंग्रजीचे ज्ञान जाणून घेतले. शिवाय ३१ ऑगस्ट व एक सप्टेंबर २०१८ रोजी ब्रिटिश कौन्सिलच्या अधिकाऱ्यांनी प्रकल्पाची अंतिम स्थिती पाहिली. त्यात सकारात्मक बदल दिसून आले. त्यामुळे यंदापासून हा प्रकल्प राज्यातील सर्वच जिल्ह्यात राबवण्यात येत आहे, असे तेजस प्रकल्पाचे श्रीधर नागरगोजे यांनी सांगितले.
  Tejas project for better english of teachers will launch soon in state

Post a comment

 
Top