हैदराबाद - दक्षिण भारतातील सुप्रसिद्ध स्टार आणि तेदेपचे नेते एन हरिकृष्ण (61) यांचे रस्ते अपघातात बुधवारी निधन झाले आहे. ते आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि महानायक एनटी रामाराव यांचे सुपुत्र होते. तसेच प्रसिद्ध दाक्षिणात्य अॅक्शन हिरो ज्युनिअर एनटीआरचे वडील होते. त्यांचा दुसरा मुलगा नंदमुरी कल्याण राम सुद्धा प्रसिद्ध अभिनेता आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, हरिकृष्ण यांचे वाहन तेलंगणाच्या नालगोंडा येथून जात होते. त्याचवेळी ओव्हरटेक करत असताना हा भीषण अपघात घडला. अपघातात गंभीर जखमी झाले असताना त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. हरिकृष्ण एका लग्नात सहभागी होण्यासाठी नेल्लोरला जात होते.
ताशी 150 च्या स्पीडने करत होते ओव्हरटेक
अभिनेता आणि नेते राहिलेले हरिकृष्ण आपल्या टोयोटा फॉर्च्युनरने नेल्लोर येथील लग्नासाठी रवाना झाले होते. या दरम्यान समोरील वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या नादात त्यांची भरधाव एसयूव्ही डिव्हायडरला धडकली आणि हवेत उडून उलटली. त्यांच्या वाहनाची स्पीड ताशी जवळपास 150 किमी होती असे सांगितले जात आहे. हैदराबादपासून 100 किमी अंतरावर असलेल्या नालगोंडा जिल्ह्यात सकाळी 6.30 च्या सुमारास हा अपघात घडला. त्यांच्या एसयूव्हीने आणखी एक कार मारुती सुझुकी डिझायरलाही धडक दिली. या अपघातात हरिकृष्ण यांचे निधन झाले. तसेच त्यांच्यासोबत प्रवास करणारे इतर 3 जण जखमी आहेत.कारच्या बाहेर फेकले गेले हरिकृष्ण...
अपघात इतका भीषण होता की हरिकृष्ण उलटत्या कारच्या काचा फोडून बाहेर फेकले गेले. यात त्यांच्या छाती आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखलही करण्यात आले होते. परंतु, डोक्याची दुखापत अतिशय गंभीर असल्याने त्यांना वाचवता आले नाही. त्यांनी 1980 मध्ये आपले वडील एनटी रामाराव यांच्या प्रचारात त्यांची कार स्वतः चालवली होती. वडील मुख्यमंत्री बनले तेव्हा ते त्यांच्या कॅबिनेटमध्ये राज्याचे वाहतूक आणि परिवहन मंत्री होते.
दोन्ही मुले सुपरस्टार, मोठ्या मुलाचे अपघाती निधन
हरिकृष्ण यांची मुले ज्युनिअर एनटीआर आणि नंदमुरी कल्याणराम हे दोघेही दाक्षिणात्य चित्रपटातील सर्वात प्रसिद्ध सुपरस्टार्सपैकी एक आहेत. वडिलांच्या अपघाताची माहिती मिळाली तेव्हापासूनच ते रुग्णालयात होते. प्रत्यक्षात हरिकृष्ण यांना एकूण 3 मुले होती. परंतु, त्यांचा सर्वात मोठा मुलगा जानकीराम याचे 2014 मध्ये रस्ते अपघातात निधन झाले. उल्लेखनीय बाब म्हणजे, 2009 मध्ये ज्युनिअर एनटीआरच्या वाहनाला सुद्धा भीषण अपघात झाला होता. परंतु, तो या अपघातातून बालंबाल बचावला.-
-
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment