स्पोर्ट्स डेस्क - वेस्ट इंडीजचा स्फोटक फलंदाज क्रिस गेल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये षटकारांचा नवा किंग ठरला आहे. बांग्लादेश विरोधात किट्स येथे झालेल्या फायनल वनडे इंटरनॅशनल मॅचमध्ये त्याने 5 सिक्सर लावले. यासोबतच, पाकिस्तानचा दिग्गज माजी फलंदाज शाहिद आफ्रिदीच्या विक्रमाची बरोबरी केली. लवकरच तो शाहिद आफ्रिदीचा सुद्धा विक्रम मोडणार हे निश्चित आहे. बांग्लादेशविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने 66 बॉलमध्ये 73 धावा काढल्या. तसेच 5 षटकार लावून आफ्रिदीची बरोबरी केली. आफ्रिदी आणि गेल या दोघांनीही आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट करिअरचे 476 षटकार पूर्ण केले आहेत. विशेष म्हणजे, आफ्रिदीने हा विक्रम 524 सामन्यांत केला होता. तर गेलला त्याची बरोबरी करण्यासाठी फक्त 443 सामनेच लागले आहेत. सिरीझमध्ये वेस्ट इंडीजचा बांग्लादेशने 2-1 असा पराभव केला. तरीही चर्चा बांग्लादेशच्या विजयाच्या नव्हे, तर गेलच्या रंगल्या आहेत.
यादीत 5 व्या क्रमांकावर धोनी
शाहिद आफ्रिदीने आपल्या एकूण 476 षटकारांपैकी 351 सिक्स वनडे, 73 सिक्स टी-20 आणि 52 सिक्स टेस्ट सामन्यांत लगावले आहेत. तर दुसरीकडे, गेलने आपल्या 476 सिक्सर्सपैकी 275 षटकार वनडे, 103 षटकार टी-20 आणि तब्बल 98 षटकार टेस्ट सामन्यांत ठोकले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या टॉप 5 खेळाडूंमध्ये एकमेव भारतीय क्रिकेटर महेंद्र सिंह धोनी आहे. त्याने 504 सामन्यांमध्ये आतापर्यंत 342 षटकार लावले. सर्वाधिक षटकार लावणाऱ्यांच्या यादीत तो पाचव्या क्रमांकावर आहे. सोबतच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर 264 षटकारांसह 9 व्या आणि 251 षटकारांसह युवराज सिंह 12 व्या क्रमांकावर आहे.

Post a Comment