रणबीर कपूरचा चित्रपट ‘संजू’वर प्रेक्षकांच्या उड्या पडताहेत़. बॉक्सआॅफिसवरचे कमाईचे अनेक विक्रम मोडीत काढत, या चित्रपटाची घोडदौड सुरु आहे. विशेषत: रणबीरचे या चित्रपटानंतर प्रचंड कौतुक होत आहे. समीक्षकांपासून तर प्रेक्षकांपर्यंत सगळ्यांनीच त्याची मनापासून प्रशंसा केली आहे. ऋषी कपूरही रणबीरचे हे यश पाहून सुखावले आहेत आणि ते स्वाभाविकही आहे. कारण दीर्घकाळानंतर रणबीरला यशाची चव चाखायला मिळतेय. याआधी आलेले त्याचे अनेक सिनेमे धडाधड आपटलेत. त्यामुळे ‘संजू’चे यश रणबीरसाठी किती महत्त्वपूर्ण असेल, याची कल्पना आपण करू शकतो. ऋषी कपूर यांनाही ही कल्पना आहे. कदाचित म्हणूनच ४० हजार फूट उंचीवरून पोराचे कौतुक करण्याचा मोह त्यांना आवरता आला नाही. होय, ऋषी यांनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे. ‘मी आकाशात आहे. माझे विमान ४० हजार फुट उंचीवर आहे, चीअर्स रणबीऱ तुला ठाऊक नाही, तुझ्या आई-वडिलांना तुझा किती अभिमान आहे. परमेश्वराची तुझ्यावर अशीच कृपा राहो. तू आणखी चांगले काम राहो,’ असे ट्विट त्यांनी केले आहे.पापाची प्रतिक्रिया साहजिकच रणबीरसाठी खास आहे. कारण ऋषी कपूर फार कमी प्रशंसा करतात. एका मुलाखतीत रणबीरने स्वत:च हे सांगितले होते. आई माझी फॅन आहे. पण पापा कधीच माझी प्रशंसा करत नाहीत, असे त्याने सांगितले होते. खु्द ऋषी कपूर यांनीही हे कबुल केले होते. मी रणबीरचे चित्रपट कधीच बघत नाही, असे ते म्हणाले होते. पण ‘संजू’ पाहून पापा खरोखरचं कमालीचे भारावले आहेत आणि त्यांचे हे असे भारावणे रणबीरसाठी कुठल्या अवार्डपेक्षा कमी नाहीये.

Post a Comment