0
Mumbai municipal corporation development work | मुंबई महानगर पालिकेची विकास कामे गेली पाच महिने ठप्प!
मुंबई - एका राज्याचा अर्थसंकल्प मुंबई महानगर पालिकेचा असतो. सुमारे 34000 कोटीच्या पालिकेच्या अर्थसंकल्पात मुंबईतील अनेक विकास कामांसाठी तरतूद करण्यात आलेली असते. मात्र वर्षाच्या सरतेशेवटी पालिकेच्या अर्थसंकल्पातील सुमारे 30 ते 40 टक्के निधीच पालिका प्रशासनाने खर्च केला नाही अशी ओरड सर्वपक्षीय नगरसेवक करत आहेत.
यंदा मुंबईतील विकासकामे गेल्या मार्चपासून ठप्प झाली आहेत अशी धक्कादायक माहिती पुढे आली आहे. कारण विकास कामांचे टेंडर मंजूर झालेल्या कंत्राटदारांना ऑनलाईन सिक्युरिटी डिपॉझिट संगणकीय प्रणालीच अजून मुंबई महानगर पालिकेच्या आयटी खात्याने कार्यान्वित केली नाही.
मंगळवारी दुपारी बोरीवली पश्चिम येथील आर मध्य विभाग कार्यालयात आर मध्य व आर उत्तर प्रभाग समितीची बैठक प्रभाग समिती अध्यक्ष रिद्धी खुरसंगे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीला आर मध्य विभागाचे सहाय्यक पालिका आयुक्त रमाकांत बिरादार व आर उत्तर विभागाच्या सहाय्यक पालिका आयुक्त संध्या नांदेडकर यांच्यासह येथील दोन विभागातील 19 नगरसेवक उपस्थित होते.
आर उत्तर विभागातील विकास कामे का ठप्प आहेत असा जाब शिवसेनेच्या प्रभाग क्रमांक 7 च्या नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी या बैठकीत पालिका प्रशासनाला विचारला होता. मुंबईसह आर उत्तर व आर मध्य येथील विकास कामे टेंडर मंजूर झालेल्या कंत्राटदारांना ऑनलाईन सिक्युरिटी डिपॉझिट संगणकीय प्रणालीच अजून मुंबई महानगर पालिकेने कार्यान्वित केली नसल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे हे नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी पालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणले.
मुंबई महानगर पालिकेत 227 नगरसेवक आहेत. त्यांना दरवर्षी त्यांच्या प्रभागातील विकास कामांसाठी 1 कोटी निधी मिळतो. मात्र पालिका प्रशासनाच्या आयटी विभागाने अजून ऑनलाईन सिक्युरिटी डीपॉझिट संगणकीय प्रणालीच कार्यान्वित केली नसल्यामुळे मुंबईतील प्रभागातील निधी आणि नगरसेवक निधींतून होणारी विकासकामे ठप्प असल्याची माहिती नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी लोकमतशी बोलतांना दिली.
प्रभाग समितीच्या बैठकीत पालिका प्रशासनावर जोरदार हल्लाबोल चढवला. आई जेवू देईना.. व बाप भीक मागू देईना अशी आज आमच्या नगरसेवकांची स्थिती झाली आहे. येत्या सहा महिन्यात जर निवडणुका लागल्या तर, आचारसंहितेत विकास कामे ठप्प होणार. आणि विकास कामे जर झाली नाही तर विभागातील नागरिकांना आम्ही काय उत्तर देणार असा संतप्त सवाल म्हात्रे यांनी पालिका प्रशासनाला केला.
या संदर्भात आर उत्तर विभागाच्या सहाय्यक पालिका आयुक्त संध्या नांदेडकर यांच्याशी संपर्क साधला असता तुम्हाला 5 मिनिटांत फोन करते असे उत्तर त्यांनी दिले, मात्र त्यांचा फोन काही आला नाही. आर मध्य विभागाचे सहाय्यक पालिका आयुक्त रमाकांत बिरादार यांनी सांगितले की, आम्ही यातून मार्ग काढला असून येथील विकासकामांसाठी  पालिका उपायुक्तांची मंजूरी घेतली आहे.

Post a Comment

 
Top