
पाकिस्तानला लागून असलेल्या आंतरराष्ट्रीय सीमेवर मे महिन्यात झालेल्या गोळीबारात एक बीएसएफ जवान शहीद झाला होता. पाकिस्तानी सैनिकानं ऍण्टी-थर्मल जॅकेट परिधान करुन गोळीबार केल्याची शक्यता त्यावेळी वर्तवण्यात आली होती. या जॅकेटमुळे नाईट व्हिजन असलेल्या डिव्हाईसला चकवा देता येतो. सीमेवर झालेल्या स्नायपर फायरिंगमध्ये जवान शहीद झाला असावा, असा अंदाज सुरुवातीला बीएसएफच्या स्थानिक कमांडरनं व्यक्त केला होता. मात्र एका हँड हेल्ड थर्मल इमेजरच्या (एचएचटीआय) फुटेजमध्ये एक काळी सावली दिसून आली. ही सावली बीएसएफच्या चौकीच्या अगदी जवळ होती. तिथूनच बीएसएफच्या जवानावर गोळीबार करण्यात आला होता.
एचएचटीआयमध्ये काळी सावली स्पष्ट दिसत नव्हती. गोळीबार करणाऱ्या व्यक्तीनं ऍण्टी-थर्मल जॅकेट परिधान केल्यानं त्याची सावली दिसली नसावी, असा अंदाज त्यावेळी व्यक्त करण्यात आला होता. मात्र एचएचटीआय शरीरातील उष्णतेच्या मदतीनं त्या भागातील व्यक्तीला शोधून काढतं. ऍण्टी-थर्मल जॅकेट परिधान करुन दहशतवाद्यांकडून घुसखोरी केली जाऊ शकते, अशी शक्यता यानंतर बीएसएफच्या सूत्रांकडून व्यक्त केली जात आहे. याशिवाय लष्कर-ए-तोयबाला मोठ्या प्रमाणात मॅगझिन, पिस्तुल, डेटोनेटर आणि नाईट व्हिजन डिव्हाईस पुरवण्यात येत असल्याचंही वृत्त आहे. या हत्यारांच्या मदतीनं पुढील काही दिवसांमध्ये जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी कारवायांमध्ये वाढ होऊ शकते.
Post a Comment