0
shubha raul says about honey bees in mumbai | मधमाश्यांची पोळी नष्ट करणं ठरेल धोक्याची घंटा - डॉ.शुभा राऊळ
मुंबई - अल्बर्ट आईनस्टाईन या शास्त्रज्ञाने सांगितले होते की, ज्या दिवशी जगातील मधमाश्या संपतील त्यानंतर शिल्लक असलेल्या अन्नसाठ्यावर माणूस पुढे चार वर्षे जगू शकेल असे भाकीत त्यांनी केले होते. त्यामुळे मधमाश्यांचा भवितव्याचा विचार करता मधमाश्यांचे संरक्षण करणे गरजेचे आहे असे मुंबईच्या माजी महापौर डॉ.शुभा राऊळ यांनी लोकमतशी बोलताना म्हटले आहे. 
मधमाश्यांची पोळी काढण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा हवी या मथळ्याखाली आजच्या लोकमत मध्ये आणि रविवारी लोकमत ऑनलाईनवर वृत प्रसिद्ध झाल्यावर त्याचे सकारात्मक पडसाद उमटले. आणि लोकमतच्या वृत्ताची जोरदार चर्चा झाली. आज मुंबईच्या माजी महापौर डॉ.राऊळ यांनी लोकमतशी संपर्क साधून आपली कैफियत मांडली. गेल्या शनिवारी बोरिवली येथील जय सिद्धिविनायक सोसायटीत झाडे तोडताना लाकूडतोड्या हसमुख खान यांना मधमाश्यांनी दंश केला होता. तर अलिकडेच बोरीवली पश्चिम येथील स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यानात मधमाश्या चावून पंकज शाह यांचा मृत्यू झाला होता.  ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे.मात्र मधमाश्यांची पोळीच नष्ट करणे हा यावर उपाय नाही असे मत त्यांनी मांडले.
बोरीवलीतील या दोन घटनांमुळे आता मधमाश्याची पोळी नष्ट करणारी यंत्रणा पालिका प्रशासनाने राबवावी अशी आग्रही मागणी शिवसेनेच्या प्रभाग क्रमांक 7 च्या नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी केली आहे. यावर त्यांनी आपली विस्तृत भूमिका लोकमतकडे व्यक्त केली. डॉ.राऊळ यांनी सांगितले की, आज जी आपल्याला फळे व फुले मिळतात ते या झाडावरुन दुसऱ्या झाडांवरून जाणाऱ्या मधमाश्या या परागकण घेऊन जातात. तसेच मध पिळून मध काढला जातो, मात्र यामधील मधमाश्यांची अंडी नष्ट करून या जीवांना मारले जाते याबद्धल त्यांनी खंत व्यक्त केली.
झाडे तोडून आपण लाखो जीवांचे नुकसान करतो. झाडे तोडताना त्यावरील असलेली घरटी यांचा विचार आपण करत नाही. प्रकल्प बाधितांना आपण घरे देतो, मात्र झाडे तोडल्यावर यावरील तोडलेल्या घरट्यांना आपण कुठे पर्यायी जागा देतो असा सवाल त्यांनी केला. आज झाडे नष्ट होत असल्यामुळे मधमाश्या या आपली पोळी इमारतीत बांधत असून आज मुंबईतील अनेक इमारतीमध्ये मधमाश्यांची पोळी आहेत अशी माहिती त्यांनी दिली.त्यामुळे मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करून वृक्षतोड देखिल थांबवली पाहिजे.म धमाश्यांसाठी जांभूळ व बकुळीची झाडे लावणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
आज खारफुटीची झाडे नष्ट केली जातात ही मुंबईसाठी धोक्याची घंटा आहे अशी भीती त्यांनी  व्यक्त केली. पालिकेच्या वृक्ष प्राधिकरणावर झाडे तोडण्याचे प्रस्ताव मंजूर होत असतात, मात्र या प्राधिकरणवर कीटक तज्ञ व पक्षी तज्ञ यांची नेमणूक केली पाहिजे. कारण झाडे तोडताना कोणत्या झाडांवर आणि कोणत्या महिन्यात पक्षी झाडांवर घरटी बांधून अंडी देतात याची माहिती ते वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत देऊ शकतील आणि परिणामी झाडे तोडताना घरटी, मधमाश्यांची पोळी आणि जन्म घेणाऱ्या जीवांचे रक्षण होईल. त्यामुळे झाडांचे रक्षण करून यावरील सूक्ष्म जीवांचा देखील विचार करणे गरजेचे असल्याचं डॉ.शुभा राऊळ यांनी सांगितलं आहे. 

Post a Comment

 
Top