0
Who is the captain of India? ... BCCI says, Mahendra Singh Dhoni! | भारताचा कर्णधार नक्की कोण?... BCCI म्हणतंय, महेंद्रसिंह धोनी!
मुंबई - भारतीय क्रिकेट संघात सत्तापालट झाला आणि महेंद्रसिंग धोनीकडून सत्तासूत्र विराट कोहलीकडे गेली. 2014 मध्ये कसोटीचे आणि 2016 मध्ये वन डे क्रिकेटचे कर्णधारपद धोनीने सोडले. कसोटीमधून निवृत्ती जाहीर करणारा धोनी अजूनही मर्यादित षटकांच्या भारतीय संघाचा अविभाज्य भाग आहे. कोहली अनेकदा त्याचा सल्ला घेत एखादा निर्णय घेतो. त्यामुळे धोनी अप्रत्यक्षरीत्या अजूनही कर्णधाराच्याच भूमिकेत आहे. त्याच्या चाहत्यांनाच नव्हे तर भारतीय क्रिकेट नियामक मंडळालाही धोनीने कर्णधारपद सोडल्याचे दु:ख पचवावेसे वाटत नाही. त्यांच्यादृष्टीने धोनीच भारतीय संघाचा कर्णधार आहे.
महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2007 मध्ये टी-20 आणि 2011 मध्ये वन डेचा विश्वचषक जिंकला. कॅप्टन कूल म्हणून ओळखल्या जाणा-या धोनीने संघाला अनेक अविस्मरणीय विजय मिळवून दिले आहेत. त्यामुळेच भारताच्या सर्वात यशस्वी कर्णधारांमध्ये त्याचे नाव उठावदार दिसते. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने 28 वर्षांचा विश्वचषक जेतेपदाचा दुष्काळ संपवला. पाचव्याच वन डे सामन्यात त्याने पाकिस्तानच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडले होते. त्याची 123 चेंडूंत 148 धावांची खेळी आजही आठवते. अशा अनेक अविस्मरणीय खेळी धोनीने साकारल्या आहेत.
कर्णधारपद सोडून दोन वर्ष झाल्यानंतरही कोहलीला कठीण प्रसंगी धोनीकडे सल्ला मागावा लागत आहे. त्यामुळे धोनीने कर्णधारपद सोडले हे मानायला मन तयार नाही. कदाचीत बीसीसीआयचीही हीच भावना आहे. त्यामुळे त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर धोनीच्या प्रोफाइलवर बरोबर नावाखाली मोठ्या अक्षरात अजूनही कर्णधार म्हणून नमूद केलेले आहे.

Post a Comment

 
Top