0
मीरारोड - भाईंदरच्या उत्तन येथील समुद्रात बुडणाऱ्या बारावीच्या तीन विद्यार्थ्यांना स्थानिक मच्छीमारांनी वाचवले. रविवारी (15 जुलै) सकाळची ही घटना आहे. तिन्ही मुलं भाईंदर येथील रहिवासी असून समुद्रातील खडकावर जाऊन सेल्फी काढत होते. पण काही वेळातच भरतीचे पाणी वाढून ते पाण्यात अडकले.  भाईंदर पूर्वेच्या तलाव मार्गावरील तुळशी इमारतीत राहणारा विशाल मोहन मिंडे ( १९) शिर्डी नगरमध्ये राहणारा सचिन शेखर वाघमारे ( १६) व नवघर मार्गावरील गीता भवनमध्ये राहणारा सुमित लवजी कटपरा ( १८) हे तिघंही बारावीचे विद्यार्थी रविवारची सुट्टी असल्याने सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास उत्तनच्या वेलंकनी तीर्थ मंदिर जवळील समुद्रात गेले होते.
यावेळी सेल्फी काढायच्या नादात पाणी कधी वाढले हे त्यांना कळलेच नाही. काही वेळातच पाणी वाढून तिघेही जण पाण्यात बुडू लागले . शिवाय लाटादेखील जोरात उसळत होत्या. त्या तिघांनी जिवाच्या आकांताने आरडाओरडा सुरु केला. त्याच वेळी वेलंकनी तीर्थ मंदिरात सकाळी 8.30 वाजताची प्रार्थना सुरु होती. समुद्रात तीन मुलं बुडत असल्याचे समजताच तेथे असलेल्या स्थानिक नगरसेविका शर्मिला गंडोली (बगाजी) यांनी अग्निशमन दल व उत्तन सागरी पोलिसांना घटनेची माहिती दिली . 
खवळलेला समुद्र व तिन्ही मुलं बुडण्याची शक्यता पाहता शर्मिला यांचे पती अजित सह गॉडवीन गौऱ्या , ग्रीसीन गोन्साल्विस , फ्रिडम  लानगी या स्थानिक मच्छीमार तरुणांनी समुद्रात उड्या घेतल्या आणि तिन्ही मुलांना सुखरूप किनाऱ्यावर आणले.
दरम्यान पालिकेचे अग्निशमन दलाचे जवान व उत्तन पोलीस घटनास्थळी आले. तिन्ही मुलांना अग्निशमन केंद्रात नेऊन पोलिसांनी त्यांची विचारपूस करत त्यांना घरी पाठवले. यापूर्वी वेलंकनी किनारी समुद्रात बुडणाऱ्यांना स्थानिक मच्छीमारांनी वाचवल्याच्या घटना घडल्या आहेत . या किनारी पर्यटक येत असले तरी सुरक्षिततेच्या दृष्टीने पालिका , पोलीस आदी यंत्रणेचे दुर्लक्ष पुन्हा चव्हाट्यावर आले आहे . 
Bhayandar : Fishermen rescued 3 students from sea | भाईंदर : उत्तन समुद्रात बुडणाऱ्या 3 विद्यार्थ्यांना मच्छीमारांनी वाचवले

Post a Comment

 
Top