0
Trump Jokes to Portugal's President About Cristiano Ronaldo, read his epic answer | ट्रम्प म्हणाले, 'रोनाल्डो राष्ट्राध्यक्ष होऊ शकत नाही'; पोर्तुगालच्या प्रमुखांनी लगावली 'फ्री किक'वॉशिंग्टनः पोर्तुगालचा फुटबॉल स्टार ख्रिस्टियानो रोनाल्डोची जगभरातील 'क्रेझ' आपल्याला ठाऊकच आहे. फिफा वर्ल्ड कप सुरू असताना, त्याच्या नावाची चर्चा झाली नाही तरच नवल. अशीच चर्चा, वॉशिंग्टनमधील 'व्हाईट हाऊस'मध्ये रंगली आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प 'ओन गोल' करून बसले.
पोर्तुगालचे राष्ट्राध्यक्ष मार्सेलो रेबेलो दी सॉसा हे दोन दिवसांपूर्वी अमेरिका दौऱ्यावर होते. त्यांनी व्हाईट हाऊसमध्ये जाऊन ट्रम्प यांची भेट घेतली. फुटबॉल फिव्हर असल्याने, विविध विषयांवर चर्चा झाल्यानंतर, फिफाच्या गप्पा सुरू झाल्या. केंद्रबिंदू होता, अर्थातच ख्रिस्टियानो रोनाल्डो.
पोर्तुगाल जगज्जेतेपदाचा दावेदार असल्याचं सॉसा यांनी ठामपणे सांगितलं. जगातला सर्वोत्तम फुटबॉलपटू पोर्तुगालचा असल्याचंही ते अभिमानानं म्हणाले. रोनाल्डोचं हे गुणगान ऐकून ट्रम्प यांनी सॉसा यांची फिरकी घेण्याचा प्रयत्न केला. 'रोनाल्डोनं कधी तुमच्याविरुद्ध पोर्तुगालची निवडणूक लढवली तर?, असा प्रश्न त्यांनी हसत हसत केला. त्यावर सॉसा उत्तर देणार तोच, ट्रम्पच म्हणाले, 'तो जिंकणार नाही. तुम्हालाही माहीत आहे तो जिंकू शकत नाही.' 
आता हा विषय संपला असं ट्रम्प यांना वाटलं. पण, आयती चालून आलेली 'पेनल्टी किक'ची संधी गमावतील ते सॉसा कसले? ते म्हणाले, 'अहो, ते पोर्तुगाल आहे, अमेरिका नाही!' त्यांचा रोख कुणाकडे आहे, हे ट्रम्प यांना बरोब्बर कळलं आणि आपण आपल्याच जाळ्यात अडकल्याची जाणीव ट्रम्पना झाली. 'येस, दॅट्स राइट' एवढंच म्हणत त्यांनीच विषय गुंडाळला.
 

Post a Comment

 
Top