0
पणजी : तुमच्या विरोधात एखादे आमदार काही बोलले तरी, तुम्ही त्यांना जाहीरपणे उत्तर देऊ नका. जाहीर उत्तर दिल्याने वाद वाढतो. तुम्ही वाद थांबवा, तो वाढवू नका, असा सल्ला भाजपाचे ज्येष्ठ मंत्री फ्रान्सिस डिसोझा यांना मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी दिला आहे. मंत्री डिसोझा यांनी हा सल्ला मान्य करून सध्या तरी गप्प राहण्याची भूमिका घेणे पसंत केले आहे.
गेले आठ दिवस गोव्यात नगर विकास मंत्री फ्रान्सिस डिसोझा आणि भाजपाचेच आमदार तथा गोवा विधानसभेचे उपसभापती मायकल लोबो यांच्यात वाद वाढला. शाब्दिक वादाने परिसिमा गाठली होती. लोबो यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालेले नाही. हे सरकार आपण घडवलेय, आपल्यामुळे गोवा फॉरवर्ड पक्ष भाजपासोबत आला, आपण किंगमेकर आहोत, अशी आमदार लोबो यांची भावना बनलेली नाही. सरकारने लोबो यांना मंत्रिपद देण्याऐवजी उत्तर गोवा नियोजन व विकास प्राधिकरणाचे (पीडीए)अध्यक्षपद दिले. तसेच त्यांनी कुठच्याच मंत्री व आमदाराविरुद्ध किंवा भाजपाच्याही धोरणांविरुद्ध कधी जाहीरपणे बोलू नये या हेतूने त्यांना विधानसभेचे उपसभापतीपद देण्यात आले होते.
मात्र लोबो हे विधानसभेतही बोलतात व विधानसभा बाहेरही काही मंत्र्यांना व सरकारी खात्यांना ते घरचा अहेर देत असतात. मंत्री डिसोझा यांच्यावर त्यांनी केलेल्या अकार्यक्षमतेच्या आरोपाच्या अनुषंगाने जो वाद निर्माण झाला त्या वाद मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आता हस्तक्षेप केला. मुख्यमंत्र्यांनी मंत्री डिसोझा यांना बोलावून घेतले व त्यांचे म्हणणो ऐकून घेतले. लोबो यांच्याशी काय बोलायचे ते मी बोलतो. तुम्ही लोबो यांना प्रत्युत्तर देऊ नका. तुम्ही गप्पच रहा. वाद वाढणार नाही याची काळजी घ्या, असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी डिसोझा यांना दिला. भाजपाही स्वतंत्रपणे येत्या दोन दिवसांत मंत्री डिसोझा यांच्याशी बोलणार आहे.
डिसोझा हे भाजपाच्या सरकारमध्ये पूर्वी उपमुख्यमंत्री होते. आता ते क्रमांक चारचे मंत्री आहेत. आपल्याला मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार आपण जास्त काही यापुढे बोलणार नाही असे डिसोझा यांनी लोकमतला सांगितले. आपण पुढील विधानसभा निवडणूक लढवायची की नाही तेही आपण निवडणुकीवेळीच ठरवीन, कारण मी देखील सध्या कंटाळलेलो आहे, असे डिसोझा म्हणाले.
Stop the dispute, ministers of Goa Chief Minister's advice | वाद थांबवा, गोव्याच्या मुख्यमंत्र्यांचा मंत्र्यांना सल्ला

Post a Comment

 
Top