0
श्रीनगर- जम्मू-काश्मीरमध्ये लागोपाठ दोन दिवस सुरू असलेल्या पावसानं झेलमसह इतर नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे काश्मीर खो-यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. पूरस्थिती लक्षात घेता प्रशासनानं तिस-या दिवशीही अमरनाथ यात्रा स्थगित केली आहे. तसेच काश्मीरमधील शाळांनाही आज सुट्टी देण्यात आली आहे.

जम्मू-काश्मीरचे राज्यपाल एन. एन. व्होरा यांनी राजभवनात एक आपत्कालीन बैठक बोलावली असून, काश्मीरमधल्या पूरस्थितीवर त्या बैठकीत चर्चा करण्यात आली आहे. सिंचन आणि पूर नियंत्रणाचे प्रमुख अभियंता एम. एम. शाहनवाज म्हणाले, झेलम नदीनं अनंतनाग जिल्ह्यातील संगम येथे शुक्रवारी संध्याकाठी 6 वाजता 21 फूट पाण्याच्या पातळीपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे दक्षिण काश्मीर आणि झेलमच्या आजूबाजूच्या परिसरात राहणा-या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या कारणामुळे अमरनाथ यात्राही थांबवली आहे.

कोणत्याही भाविकाला उत्तर काश्मीरच्या बालटाल, तर दक्षिण काश्मीरच्या पहलगामच्या पुढे जाऊ देत नाही आहेत. प्रशासनानं सर्व भाविकांना दोन शिबिरांमध्ये सुरक्षितरीत्या ठेवलं आहे. श्रीनगरचे उपायुक्त सय्यद आबिद शाह यांनी काश्मीरमधील परिस्थिती पाहता शाळा बंद ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत.

Post a Comment

 
Top