0
नवी दिल्ली: राज्यसभेच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीत स्वत: उतरण्याऐवजी काँग्रेस पक्ष पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना टाळी देणार आहे. उपसभापतीपदाच्या निवडणुकीसाठी आकडे अनुकूल असूनही काँग्रेसनं तृणमूलच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. 2019 मधील निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजपाविरोधी पक्षांमधील 'ममता' वाढवण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून केला जात आहे. कर्नाटकमध्येही काँग्रेसनं अशीच खेळी करत भाजपाला सत्तेपासून दूर ठेवले होते. कर्नाटकमध्ये मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांच्या शपथविधीत विरोधकांची एकजूटही दिसून आली होती. 

ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसकडून सुखेंदू सेखर रॉय यांनी राज्यसभेच्या उपसभापतीपदाची उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. 1969 ते 1977 या आठ वर्षांचा अपवाद वगळता राज्यसभेचं उपसभापतीपद कायम काँग्रेसकडे राहिलं आहे. 245 जागा असलेल्या राज्यसभेत काँग्रेसचे 51 खासदार आहेत. सध्या पी. जे. कुरियन यांच्याकडे राज्यसभेचं उपसभापतीपद असून त्यांचा कार्यकाळ संपत आला आहे. 18 जुलैपासून सुरू असलेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात उपसभापतीपदासाठी निवडणूक होईल.  

उपसभापतीपदाच्या निवडणुकीमुळे कर्नाटकपाठोपाठ विरोधकांची एकजूट दाखवण्याची आणखी एक संधी काँग्रेसला मिळाली आहे. ही संधी 'हाता'तून निसटू नये, यासाठी काँग्रेसचे प्रयत्न सुरू आहेत. उपसभापतीपद भाजपाला मिळू नये, यासाठी काँग्रेसनं तृणमूलच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. यासाठी काँग्रेसला बिजू जनता दल आणि तेलंगणा राष्ट्र समितीच्या मदतीची आवश्यकता आहे. हे दोन्ही पक्ष तृणमूलला अनुकूल आहेत. याआधी 26 वर्षांपूर्वी म्हणजेच 1992 मध्ये राज्यसभेच्या उपसभापतीपदासाठी निवडणूक झाली होती. त्या निवडणुकीत नजमा हेपतुल्ला काँग्रेसच्या उमेदवार होत्या. हेपतुल्ला आता भाजपामध्ये आहेत. त्या निवडणुकीत हेपतुल्ला यांनी विरोधी पक्षांच्या उमेदवार रेणुका चौधरी यांचा पराभव केला होता. 
 
Rajya Sabha deputy chairperson post election Congress to back Mamata Banerjees candidate | ममतांना काँग्रेसची टाळी, राज्यसभेतही भाजपाला धक्का देण्यासाठी कर्नाटकी खेळी?

Post a Comment

 
Top