0
maharashtra vidhan parishad election result mlc election result 2018 graduates and teachers constituency result | Vidhan Parishad Election Result : विधान परिषद निवडणुकीच्या चारही जागांचे निकाल जाहीर
मुंबई : विधान परिषदेच्या चारही जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. कोकण पदवीधर, मुंबई पदवीधर, तर मुंबई शिक्षक आणि नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या जागांचा निकाल जाहीर झाला आहे. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत अखेर भाजपाचे निरंजन डावखरे यांनी बाजी मारली. डावखरे यांनी आपले निकटचे प्रतिस्पर्धी शिवसेनेचे संजय मोरे यांचा 2988 मतांनी पराभव केला. निवडणूक आयोगाच्या अनुमतीनंतर सकाळी 6.45 वाजता डावखरे यांचा विजय झाल्याची घोषणा करण्यात आली.  कोकण पदवीधरमध्ये शेवटच्या फेरीत सर्व 12 उमेदवार बाद फेरीत बाद झाल्यावर दुसऱ्या क्रमांकवरील संजय मोरे यांची 24,704 मते ट्रान्सफरसाठी घेण्यात आली. पहिल्या फेरीत डाखरेंना 10,304 मोरेंना 9, 494 मते मिळाली होती. तर दुसऱ्या फेरीनंतर डावखरे यांना 11,180 आणि मोरे यांना 8,997 मते मिळाली होती.तिसऱ्या फेरीत डावखरेंनी निर्णायक आघाडी घेतली. या फेरीत त्यांना 28,945 तर मोरेंना 23,211 मते मिळाली. या फेरीत डावखरे हे 5,734 मतांनी आघाडीवर होते. मात्र कोटा पूर्ण करण्यासाठी अपेक्षित असलेली मते न मिळाल्यामुळे दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी करण्यात आली. या निवडणुकीत सुमारे अडीच हजाराहून अधिक मते अवैध ठरली. 
नाशिक - 
नाशिकमधून शिवसेना पुरस्कृत उमेदवार किशोर दराडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्ष पुरस्कृत संदीप बेडसे यांचा पराभव केला. मुंबईतील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या चुरशीच्या निवडणुकीत भाजपाची चांगलीच दमछाक झाली. हा मतदारसंघ आपल्याकडे खेचून आणण्यात शिवसेना यशस्वी झाली. मुंबई पदवीधर मतदारसंघात शिवसेनेच्या विलास पोतनीस यांनी भाजपावर मात केली, तर लोकतांत्रिक जनता दलाचे कपिल पाटील यांनी विजयाची हॅट्ट्रिक करून, शिक्षक मतदारसंघावरील आपले वर्चस्व सिद्ध केले. कपिल पाटील यांच्या पराभवासाठी भाजपा व शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सर्व ताकद पणाला लावली होती. मात्र, पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेत त्यांनी भाजपाच्या मनसुब्यांवर पाणी फेरले. कपिल पाटील यांच्यासमोर भाजपाचे अनिल देशमुख, सेनेचे शिवाजी शेंडगे होते. कपिल पाटील यांना 4050, शिवाजी शेंडगेंना 1736 तर अनिल देशमुख यांना 1124 मते मिळाली आहेत.

Post a Comment

 
Top