0
सांगली : संकटाने खचून जाण्यापेक्षा, संकट ही एक वेगळ्या पद्धतीने जीवन जगण्याची संधी समजून जगायला शिकले पाहिजे. मतिमंदत्वाबरोबर मुलांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या आजारातून पालकांनीही हाच बोध घेऊन त्यांच्यासाठी व स्वत:साठीही जगले पाहिजे, असे मत लेखक डॉ. अनिल अवचट यांनी व्यक्त केले.

नवजीवन मतिमंद शाळेत संस्थेचा ३३ वा वर्धापनदिन कार्यक्रम पार पडला. अनिल अवचट व कार्यक्रमाचे अध्यक्ष अ‍ॅड. सनतकुमार आरवाडे यांच्याहस्ते दीपप्रज्ज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
उपस्थित पालक व मुलांशी संवाद साधताना अवचट म्हणाले की, मतिमंद मुले जन्माला येण्यात पालकांचा दोष काहीच नसतो. संकट आले म्हणून खचण्यापेक्षा, त्याला सक्षमपणे सामोरे जायला हवे.
संकटांना जगण्याचे साधन बनविता येऊ शकते. संकटाकडे संकट म्हणून न पाहता, ती एक संधी म्हणून पाहावे. कोणत्याही आजारावर कला हा उपाय ठरू शकतो. कलेच्या स्पर्शाची जादू वैद्यकीय उपचारांपेक्षाही अधिक प्रभावी ठरल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे मतिमंद किंवा अन्य कोणत्याही आजाराने ग्रस्त असलेल्या मुलांच्या पालकांनी सक्षमपणे या समस्यांना सामोरे जावे.

बऱ्याचदा समाजात बुद्धिमान समजणाऱ्या लोकांकडून माणुसकीचा घात होत असतो. अशी मती असण्यापेक्षा मती नसलेली बरी. मतिमंद मुलांमध्ये कमालीचे कलागुण असतात. बुद्धिमान माणसावरही मात करण्यासारख्या अनेक गोष्टी त्यांच्याकडे असतात. त्यांचा शोध घेऊन त्या गोष्टी विकसित करण्यावर भर देण्याची गरज आहे.
आपल्यापुरते पाहण्याच्या स्वार्थी संस्कृतीत दुसऱ्याचे दु:ख हलके करण्याची मानसिकता वाढविणे गरजेचे आहे. संकटांमुळे हिंमत मिळते, जगण्याचा मार्ग मिळतो. त्यामुळे सकारात्मकतेने त्याकडे पाहायला शिका, असे आवाहन त्यांनी केले.

सनतकुमार आरवाडे म्हणाले की, मतिमंद मुलांसाठी कार्य करणारी नवजीवन संस्था उभारताना अनेक अडचणींचा सामना रेवती हातकणंगलेकर यांना करावा लागला. उच्चशिक्षित असूनही त्यांनी आरामदायी आयुष्य देऊ शकणारे क्षेत्र निवडण्याऐवजी, आव्हानात्मक क्षेत्राची निवड केली. त्यांचा प्रवास फार खडतर आहे. खडतर प्रवासातूनच त्यांनी सामाजिक कार्याचा नवा आदर्श निर्माण केला आहे.
मळलेल्या वाटांवरून कोणीही चालू शकते. पण जिथे वाटच नाही, त्याठिकाणी नवी वाट निर्माण करण्याचे कार्य हातकणंगलेकर यांनी केले आहे. नियतीने ज्यांच्यावर अन्याय केला आहे, अशा मुलांना त्यांच्या बळावर उभे करणे, हे काम सोपे नाही.

संस्थेच्या अध्यक्षा रेवती हातकणंगलेकर म्हणाल्या की, मतिमंद मुलांना घडविताना त्यांच्या कुटुंबियांच्या चेहऱ्यावरचे समाधान आमच्यासाठी महत्त्वाचे वाटते.
प्लास्टिक बंदीच्या निर्णयापूर्वी किती तरी महिने अगोदरपासून आम्ही कागदी पिशव्यांच्या निर्मितीचे प्रशिक्षण या मुलांना देण्यास सुरुवात केली आहे. मुलांनी निर्माण केलेल्या या वस्तूंना आता मोठी मागणी आहे.सूत्रसंचालन मानसी पंडितराव यांनी केले. यावेळी काही पालकांचा सत्कारही करण्यात आला.

अठरा वर्षांनंतर काय?

महापालिकेचे सेवानिवृत्त कर्मचारी व संस्थेतील एका मुलाचे पालक महंमदअली पटवेगार म्हणाले की, संस्थेच्या माध्यमातून मुलांना घडविण्याचे काम अत्यंत चांगल्या पद्धतीने होत आहे. मात्र ही मुले शिकल्यानंतर म्हणजे १८ वर्षांनंतर त्यांच्या भवितव्याची काय व्यवस्था आपल्याकडे आहे? शासनस्तरावर या मतिमंद मुलांच्या रोजगाराची व्यवस्था कोणत्याही माध्यमातून होणे गरजेचे आहे.
Sangli: Parents with mentally retarded children should live for themselves: Anil Avchat | सांगली : मतिमंद मुलांसह पालकांनीही स्वत:साठी जगले पाहिजे : अनिल अवचट

Post a Comment

 
Top