0
पुणे : खासगी बसचे भाडेदर नियंत्रित करण्याच्या शासन निर्णयानंतर प्रवाशांच्या याबाबतच्या तक्रारी येण्यास सुरुवात झाली आहे. मागील पंधरा दिवसंत प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे आलेल्या तक्रारींनुसार आठ जणांना नोटीस पाठविण्यात आली आहे. दरम्यान, प्रवाशांकडून येणाऱ्या काही तक्रारींमध्ये अर्धवट माहिती असल्याने कारवाई करण्यात अडचणी येत आहेत.
सध्या सुट्ट्यांचा हंगाम सुरू असल्याने बाहेरगावी जाण्यासाठी नागरिकांकडून एसटीसह खासगी बसचाही मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. या बसला होणारी गर्दी मोठी असल्याने खासगी प्रवासी वाहतुक करणाºयांकडून अनेकदा त्याचा गैरफायदा घेतला जात होता. पूर्वी या बसच्या भाडेदरावर कसलेही नियंत्रण नव्हते. त्यामुळे भरमसाट भाडेवाढ करून प्रवाशांची लूट होत होती. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी खासगी बसचे कमाल भाडे निश्चित करण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यानुसार खासगी बससाठी प्रति किलोमीटर भाडेदर त्याच स्वरूपाच्या एसटी बससाठी येणाºया प्रति किलोमीटर भाडेदराच्या ५० टक्केपेक्षा अधिक राहणार नाही, असे कमाल भाडेदर निश्चित करण्यात आले.
या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी राज्य परिवहन प्राधिकरण आणि प्रादेशिक परिवहन प्राधिकरणावर (आरटीए) सोपविण्यात आली आहे.
आरटीएचे सचिव प्रादेशिक परिवहन अधिकारी असल्याने या विभागाकडून कारवाई सुरू करण्यात आली आहे. पुणे विभागाचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार, शासन निर्णयानुसार आता खासगी बसचे भाडे नियंत्रित करण्यात आले आहे. त्यापेक्षा अधिक भाडे आकारणाºयांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी स्वतंत्र पथके स्थापन केली आहेत.
प्रवाशांकडून काही तक्रारी असून, त्यानुसार आठ जणांना नोटीस पाठविण्यात आली आहे. त्यांचे म्हणणे आल्यानंतर खटले दाखल केले जातील. निश्चित करण्यात आलेले कमाल दर परवडणारे असल्याने वाहतूकदारांकडून त्याचे उल्लंघन केले जात नाही.

वातानुकूलित, शयनयान बसच्या भाडेदराबाबत अद्याप संभ्रम आहे. त्यामुळे आरटीओने वाहतूकदारांची बैठक घेऊन त्याबाबत माहिती द्यायला हवी. भाडेदर, कारवाईचे स्वरूप याबाबत स्पष्टता नाही. खासगी बस थांबतात, त्याठिकाणी प्रवाशांच्या माहितीसाठी तक्रारीबाबत माहिती प्रदर्शित करायला हवी, असे महाराष्ट्र राज्य मालवाहतूक व प्रवासीवाहतूक संघटनेचे अध्यक्ष बाबा शिंदे यांनी सांगितले.

Post a Comment

 
Top