0
मुंबई : रागाने पाहिले म्हणून एका तरुणाची हत्या केल्याची घटना नागपाड्यात शुक्रवारी रात्री उशिराने घडली. यात एक जण गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी शनिवारी पहाटे आरोपी फाझील करीम अन्सारी (३५) याला अटक करण्यात आली.
मदनपुरा येथील लोहाटी चाळ परिसरात रात्री उशिराने मोहम्मद रशीद सईद अन्सारी (३०) हे मित्र मोहम्मद रिजवान कुरेशी (३०) सोबत गप्पा मारत होते. त्याचदरम्यान फाझीलही तेथे आला. अन्सारीने त्याच्याकडे पाहिले. तेव्हा फाझीलने त्याला हटकले; आणि त्याला क्या देख रहा है.. असे विचारले. यावरूनच दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. बाचाबाचीचे रूपांतर हाणामारीत झाले. फाझीलने त्याच्याकडील चाकूने दोघांवर वार केले.
घटनेची माहिती मिळताच नागपाडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण आणले व जखमींना नायर रुग्णालयात दाखल केले. तेथे अन्सारीला मृत घोषित केले, तर कुरेशीवर अतिदक्षता विभागात उपचार करून नंतर खासगी रुग्णालयात हलविले आहे.
पहाटेच्या सुमारास फाझीलला अटक करण्यात आली आहे.

Post a Comment

 
Top