0
दिव्य मराठी विशेष: बंदोबस्तावर आलेल्या पोलिसांना नागरिकांनी दिले जेवण
औरंगाबाद-मागील तीन दिवसांपासून शहरात प्रचंड तणावाचे वातावरण आहे. शहरात शांतता प्रस्थापित करण्यासाठी तीन दिवसांपूर्वी रस्त्यावर उतरलेल्या पोलिसांना मिनिटभराचीही उसंत मिळाली नाही. सतत बंदोबस्त असणाऱ्या पोलिसांना जेवण तर सोडा, पण साधा चहाही मिळणे मुश्कील बनले होते. शहराच्या कानाकोपऱ्यात गस्त घालणाऱ्या चौकाचौकांत ठिय्या देऊन बसलेल्या पोलिसांच्या मदतीला नागरिक धावले. धावणी मोहल्ला उस्मानपुरा येथील गुरुद्वारांच्या वतीने आज शहराच्या विविध भागांत बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांना गरमागरम खिचडीचे वाटप करण्यात आले. बंदोबस्तावरील काळात मिळेल ते खाऊन कामाला भिडलेल्या पोलिसांना यामुळे पोटभर जेवण मिळाले. अमरेशसिंग, कुलदीपसिंग, लख्खा सिंग, कंवलसिंग, इंदरसिंग सतवाल, इंदरजितसिंग निऱ्ह यांच्यासह शीख बांधवांचा चमू या कामात गर्क होता.

सुनील वाघ त्यांच्या मित्रमंडळींनीही पोलिसांसाठी मदतीचा हात दिला. त्यांनी टीव्ही सेंटर, दूध डेअरी सिग्नल, क्रांती चौक, बाबा पेट्रोलपंप येथे बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांना तेथे जाऊन चहा नाष्टा वाटप केले. रेल्वेस्टेशन परिसरात तणावाची स्थिती जरा अधिकच होती. त्यामुळे वेदांतनगर पोलिसांवर कामाचा ताण पडला. सततचे काॅल, गस्त संवेदनशील चौक अशा स्थितीत येथील पोलिस कर्मचारी कामावर होते. कोकणवाडी चौकात रात्री डोळ्यात तेल घालून पहारा देणाऱ्या पोलिसांना शिवसेनेचे शहरप्रमुख विजय वाघचौरे, संजय बारवाल, योगेश कोटगिरे त्यांच्या सहकाऱ्यांनी जेवणाचे डबे पुरवले. त्याशिवाय आज सकाळी बन्सीलालनगर भागात गस्तीवरील पथकांसाठी चहा नाष्ट्याचीही सोय करून देण्यात आली होती.

Post a Comment

 
Top