0
मुंबई शिवराज्याभिषेक सोहळ्याचा चित्ररथ राजपथावर प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने अवतरला आणि त्याने सर्वांची मने जिंकली. या चित्ररथाची संकल्पना जे. जे. स्कूल ऑफ आर्टचे निवृत्त प्राध्यापक नरेंद्र विचारे यांची होती. यापूर्वीही प्रा. विचारे यांच्या संकल्पनेतून अवतरलेल्या तीन चित्ररथांनी महाराष्ट्राला प्रथम क्रमांक मिळवून देत हॅट्ट्रिकची किमया साधली होती.

१९९३ मधील ‘महाराष्ट्राचा गणेशोत्सव’ हा चित्ररथ प्रा. विचारे यांच्या संकल्पनेतून साकार झाला होता. त्यावेळी आराध्यदैवत असलेल्या गणपती बाप्पांच्या चित्ररथाने दिल्लीकर हरखून गेले होते. महाराष्ट्राच्या या चित्ररथाने प्रथम क्रमांक पटकावला होता. त्यानंतर दुसऱ्याच वर्षी म्हणजे १९९४ मध्ये महाराष्ट्राचे फळ असलेल्या हापूस आंब्याची ऐट चित्ररथातून दिल्लीकरांना दिसली होती. त्यावेळी १६ फुटांचा हापूस आंबा चित्ररथातून साकारण्यात आला होता. कोकणातल्या एका गावाची गोष्ट चित्ररथातून मांडली होती. आंबा काढल्यापासून त्याच्या निर्यातीपर्यंतचे टप्पे दर्शवण्यात आले होते. तिसऱ्या वर्षी १९९५ मध्ये महात्मा गांधी यांच्यावर चित्ररथ साकारण्यात आला होता. गांधीजींचे टेबल, चरखा, त्यांचा चष्मा, दौत चित्ररथात होते. तिन्ही वर्षी सलग महाराष्ट्राला प्रा. नरेंद्र विचारे यांनी प्रथम क्रमांक मिळवून दिला होता. नुकत्याच साजरा झालेल्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या चित्ररथानेही चौथ्यांदा दिल्लीकरांची मने जिंकली आणि महाराष्ट्राला प्रथम क्रमांक मिळाला.
नागपूर केंद्रालाही प्रथम पुरस्कार
राजपथावर झालेल्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांत बरेदी लोकनृत्य सादर करणाऱ्या नागपूरच्या दक्षिण-मध्य सांस्कृतिक केंद्राला प्रथम पुरस्काराने गौरविण्यात आले. या केंद्राचे संचालक इंद्रजित ग्रोवर यांनी पुरस्कार स्वीकारला. 

राजपथावर चित्ररथ साकारणे म्हणजे महाराष्ट्राच्या संस्कृतीचे अभ्यासपूर्ण दर्शन घडवणे. महाराष्ट्राची संस्कृती आकर्षकरित्या देशासमोर मांडण्याचा प्रयत्न असतो. यंदा लढवय्ये शिवाजी महाराज प्रतिकात्मकरित्या साकारले होते.  


Post a Comment

 
Top