0
संभाजी भिडेंच्या विरोधात बोलणाऱ्यांची लायकी नाही; उदयनराजेंचा शरद पवारांना घरचा आहेर
नवी दिल्ली- शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्याविषयी मनात आदर असून, त्यांच्याविषयी बोलण्याची कोणाची लायकी नाही, अशी प्रतिक्रिया देत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनी राष्‍ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना घरचा आहेर दिला आहे.
भीमा कोरेगाव येथील हिंसाचारानंतर राज्यातील परिस्थिती हाताबाहेर गेली होती. दलित संघटनांनी 3 जानेवारीला महाराष्‍ट्र बंदची हाक दिली होती. या बंदला हिंसक वळण लागले होते. त्यामुळे नागरिकांची माथी भडकतील, असे वक्तव्य कोणत्याही नेत्याने करू नये, असे आवाहन खासदार उदयनराजे यांनी केले आहे.
गुरुजींच्या विरोधात बोलणार्‍यांचीलायकी नाही.... उदयनराजे
भिडे गुरुजी वडीलधारे आहेत. त्यांच्याबद्दल मनात आदर आहे आणि आदर राहाणार. त्यांनी लहान मुलांचे संघटन केले. त्यांचा या प्रकरणाशी काही संबंध पण नाही. त्यांच्याविरोधात बोलणाऱ्यांची लायकी नाही, असेही मत उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले आहे.
दरम्यान, कोरेगाव भीमा दगडफेकी प्रकरणी भिडे गुरुजी आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भिडे गुरुजी दगडफेकीची सूत्रधार असल्याचा आरोप भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. तसेच या घटनेमागे काही हिंदुत्त्ववादी संघटना असल्याचा आरोप शरद पवार यांनीही केला आहे. परंतु, उदयनराजे यांनी संभाजी भिडे यांची पाठराखण केली आहे.

Post a Comment

 
Top