0
सिडको - सिडको प्रभाग २९ मधील घंटागाडी कर्मचाऱ्यांनी महिलांशी उद्धट वर्तन केल्याच्या प्रकाराने महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. महिलांसमोर सिनेमातील गाणे म्हणत धूम्रपान करत दोन कर्मचाऱ्यांनी उद्धट वर्तन केले. शिवाय आम्हाला जसे वागायचे तसे अाम्ही वागू , असे म्हणत तुम्ही आम्हाला पगार देता काय? असा प्रतिप्रश्न करत तुमचा कचरा घेणार नाही, अशी थेट धमकीच त्यांनी दिली. काही घाबरलेल्या महिलांना या प्रकाराने अश्रू अनावर झाले तर काहींनी कचरा देण्याची हिंमतच केली नाही. याबाबत घंटागाडी कर्मचाऱ्यांवर तत्काळ कारवाईची मागणी महिलांनी केली आहे.
रविवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास घंटागाडी (एमएच १५ एफव्ही १००९) उत्तमनगर येथून जात होती. कचरा टाकण्यासाठी महिलांनी गर्दी केली असता गाडी थांबल्यानंतर कचरा घेणारे दोन कर्मचारी सिगरेट अाेढत महिलांकडे बघून सिनेमातील गाणी म्हणत होते. महिलांनी या प्रकाराकडे दुर्लक्ष केले. मात्र याबाबत एका महिलेने त्यांना असे वागू नका, असे म्हटले. त्याचा राग आल्याने या कर्मचाऱ्यांनी म्हटले की, ‘कसे वागायचे ते तुम्ही आम्हाला शिकवू नका, तुम्ही पगार देता काय? आम्ही तुमचा कचरा घेणार नाही, निघा इथून’ असे म्हणत महिलांचा कचरा घेता हाकलून दिले. यामुळे घाबरलेल्या अनेक महिलांनी कचराच टाकला नाही. तर काही महिला घाबरलेल्या अवस्थेत घरी जाऊन रडत बसल्या. हे कर्मचारी पुन्हा याच घंटागाडीवर येणार असतील तर महिलांनी कचरा टाकण्याचा निर्णय घेतला असून हे कर्मचारी मद्यपी गुंड असल्याचाही आरोप महिलांनी केला आहे. याबाबत तत्काळ कारवाई करावी, अन्यथा रस्त्यावर कचरा फेको आंदोलन करू, असा इशारा देण्यात आला आहे.
मला रडू काेसळले
घंटागाडीवरील ते कर्मचारी सिगारेट अाेढत आमच्याशी अतिशय उद्धट गुंडगिरीच्या भाषेत बोलले. मला या प्रकाराने खूप भीती वाटली. सर्वांसमोर आम्हाला असे बोलल्याने मला रडूच कोसळले. या कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी.
- एक घाबरलेली महिला.
महिलांकडे बघून सिनेगीत म्हणतात घंटागाडी कर्मचारी, सिडकाेतील घटना

Post a Comment

 
Top