0
महाराष्ट्राच्या ‘माणिक’चा गौरव; मंत्री विनाेद तावडे यांचे गाैरवाेद‌्गार, गायिका भिडे यांचा सन्मान
मुंबई-‘शास्त्रीय गायिका माणिक भिडे या खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या माणिक आहेत. त्यांना प्रदान होणारा भारतरत्न पं. भीमसेन जोशी जीवनगौरव पुरस्कार म्हणजे महाराष्ट्राचा गौरव आहे,’ असे गाैरवाेद््गार सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडेंंनी साेमवारी काढले. सांस्कृतिक संचालनालयातर्फे देण्यात येणारा हा पुरस्कार पं. अरविंद परिख यांच्या हस्ते माणिक भिडे यांना प्रदान केला गेला. या वेळी विनोद तावडे, पं. केशव गिंडे, पं. नाथ नेरळकर आदी उपस्थित होते.

‘आकाशवाणीच्या प्रत्येक कार्यक्रमांत आम्ही माणिकताईंचे सूर ऐकले. त्यांना जीवनगौरव पुरस्कार देणे म्हणजे महाराष्ट्राचा गौरव आहे. नजीकच्या काळात शास्त्रीय संगीत व संगीत नाटकांची उच्च परंपरा कशी पुढे नेता येईल, याचा कृती आराखडा बनवण्याचे काम सुरू आहे. नवीन पिढीत शास्त्रीय संगीताची आवड रुजवण्यासाठी प्रयत्न करीत आहोत,’ असेही तावडे यांनी सांगितले. २०१९ मध्ये सुधीर फडके, गदिमा व पु.ल. देशपांडे या महान व्यक्तींचे जन्मशताब्दी वर्ष येत आहे. ते नियोजनबद्ध पद्धतीने साजरे करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. या जन्मशताब्दी वर्षामध्ये फक्त उत्सव साजरे करायचे नसून, नवीन पिढीमध्ये किमान २५ संगीतकार कवी, गायक, साहित्यिक निर्माण करावयाचे आमचे उद्दिष्ट आहे, असेही तावडेंनी सांगितले.

संगीताचा गाभा सर्वांनी जपावा : माणिक भिडे
सत्काराला उत्तर देताना माणिक भिडे म्हणाल्या, आज आपल्याला मिळालेला पुरस्कार वैयक्तिक नाही तर गुरूंचा आशीर्वाद आहे. संगीत क्षेत्रात गुरु-शिष्याची परंपरा आजही कायम असून माझा गौरव म्हणजे गुरु-शिष्य परंपरेचा गौरव आहे. नवी पिढी शास्त्रीय संगीताकडे वळत असून शास्त्रीय संगीतामध्ये संगीतसाधक व्हायचे असेल तर गुरु-शिष्य परंपरा जोपासली पाहिजे, असे मतही त्यांनी व्यक्त केले. आज सोशल मीडियाच्या जमान्यात संगीताचा गाभा सर्वांना जपायचा आहे. त्याचे भान सर्वांनी राखायचे आहे, असेही त्या म्हणाल्या.

Post a Comment

 
Top